जयानंद मठकर स्मृती पुरस्कार प्रदान ; आयुष्यातील हा पहिला पुरस्कार : माजी आम.श्रीपतराव शिंदे

आत्ताचे राजकारणी रात्रीत विचार बदलतात : ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2023 11:30 AM
views 231  views

सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक, साप्ताहिक वैनतेयचे माजी संपादक व ज्येष्ठ समाजवादी नेते कै.जयानंद मठकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार माजी आमदार अँड. श्रीपतराव शिंदे यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी श्रीराम वाचन मंदिरमध्ये शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्काराच वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अँड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा पहिला पुरस्कार आहे. कै. जयानंद मठकर हे मला गुरुस्थानी होते. त्यांचा नावानं पुरस्कार मिळाला याचा हाडाचा समाजवादी असल्यानं आनंद आहे अस मत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले.


श्रीराम वाचन मंदिर येथे हा पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. माजी आमदार कै. जयानंद मठकर यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त या सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते माजी आमदार मठकर यांच्या प्रतिमेच पुजन करत अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले, आजकालच्या राजकारणात श्रीपतराव शिंदे यांच्यासारखे विचारांची एकनिष्ठ राहणारे आता उरले नाहीत. आताचे राजकारणी आपले विचार एका रात्रीत बदलतात. जसे लोक तसं सरकार अशी परिस्थिती राज्याची आहे. त्यामुळे सरकार नव्हे तर जनताच व्हेंटिलेटरवर आहे. सेवा दल जगवलं नाही तर आपली मुलं आरएसएसमध्ये कधी जातील हे समजणार नाही. त्यांच्यापुढे दूसरा पर्याय उरणार नाही. यासाठी आपल्या चळवळीला नवे बळ द्यावे लागेल तरच शेवटच्या माणसाचे प्रश्न समोर येतील, अन्यथा टाचा घासून आयुष्य संपविण्यापलिकडे काहीही शिल्लक राहणार नाही असं मत डॉ. गवस यांनी व्यक्त केल. 


दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते कै. जयानंद मठकर स्मृती पुरस्कार माजी आमदार अँड. श्रीपतराव शिंदे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देताना माजी आमदार अँड. शिंदे म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा पहिलाच पुरस्कार आहे. मला कधी पुरस्कार कुणी द्यायला आलं नाही. आलं तर ते परवडणार नव्हतं. स्वतःच कौतुक किती ऐकाव ? याला पण एक मर्यादा आहे. देवबागला शिक्षकी पेशात काम केल्यानं कोकणशी व कोकणी माणसाची मायेचं नातं निर्माण झालं. त्यामुळे आज हा पुरस्कार स्विकारताना आनंद होत आहे. त्यात कै. माजी आमदार जयानंद मठकर हे मला गुरुस्थानी होते. त्यांच्या आमदारकीच्या काळात मी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यांचा नावानं पुरस्कार मिळतो याचा हाडाचा समाजवादी म्हणून अभिमान आहे असं मत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी व्यक्त केले. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुरस्कार प्राप्त श्रीपतराव शिंदे यांना शुभेच्छा देत माजी आमदार कै. जयानंद मठकर यांच्या स्मृती जागृत केल्या. यावेळी ज्येष्ठ साहित्य डॉ. राजेंद्र गवस, प्रा. प्रवीण बांदेकर, कमलताई परूळेकर, प्रसाद पावसकर, रमेश बोंद्रे, अँड संदीप निंबाळकर, मिलींद मठकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुमेधा नाईक-धुरी यांनी तर आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.