जावेद खतीब की बाळू सावंत?, बांदा उपसरपंच पदासाठी चुरस!

३० डिसेंबर रोजी फैसला
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 26, 2022 15:56 PM
views 202  views

बांदा : बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दिनांक ३० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीत भाजपची निर्विवाद सत्ता असल्याने उपसरपंच कोण? याकडे लक्ष लागले आहे. सरपंचपदी प्रियांका नाईक या महिला असल्याने पुरुष उमेदवाराला प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसऱ्या टर्ममधून निवडून आलेले अनुभवी सदस्य जावेद खतीब व राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या नावांची चर्चा आहे.

बांदा ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने ११ जागांवर, शिवसेनेने ३ जागांवर विजय मिळविला आहे. सरपंचपदी भाजपच्या प्रियांका नाईक विराजमान झाल्या आहेत. विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी ३० रोजी नवनिर्वाचित सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी पहिली सभा घेण्यात येणार आहे.

सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करणे, दुपारी १.३० ते १.४५ वाजेपर्यंत अर्जांची छाननी, १.४५ ते २ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ ठेवण्यात आली आहे. एकहून अधिक उमेदवार असल्यास प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात येणार आहे. मतांची बेरीज समसमान झाल्यास सरपंच यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. पक्षीय बलाबल पाहिल्यास भाजपचा उमेदवार सहज निवडून येण्याची शक्यता आहे. या पदासाठी अनुभवी सदस्य जावेद खतीब व बाळू सावंत यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविस्तार अधिकारी लीला मोर्ये काम पाहणार आहेत.