
देवगड : जामसंडे बेलवाडी येथील लघुनळ योजना विस्तार करणे हे काम नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविणे सहाय्य योजना सन २०२२-२३ या योजनेमध्ये कामाचा कार्यारंभ आदेश १४ मार्च २०२४ रोजी निर्देशित झालेला होता. परंतू अद्याप सहा महिने उलटून देखील सदर काम पुर्ण झालेले नाही किंवा काम चालु स्थितीत नाही.त्यामुळे येणारा उन्हाळा लक्षात घेता जामसंडे बेलवाडी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होवू शकते. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून लघुनळ योजना लवकरात लवकर पुर्णत्वास न्यावी व पाणी टंचाईचा प्रश्न नगरपंचायतीने सोडवावा अशी मागणी होत आहे.
त्यामुळे सदर लघुनळ योजनेचे रखडलेले काम पुर्ण करावे व आठ दिवसात कार्यवाहीची माहिती द्यावी अशी मागणी जामसंडे बेलवाडी ग्रामस्थांनी देवगड - जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जामसंडे बेलवाडी येथील विजय य. नलावडे, मंगेश नलावडे, पारस नलावडे, विरेंद्र नलावडे, दिनेश पवार, महेश नलावडे इत्यादींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.