जालन्यातील घटनेचा देवगड तालुक्यात निषेध

देवगड तहसीलदारांना मराठा समाजाच्यावतीने निवेदन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 04, 2023 22:03 PM
views 106  views

देवगड: जालन्यात शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर पोलीसांनी अमानुष लाठीमार, गोळीबार केला आहे. हा प्रकार निंदनीय असुन जे अधिकारी या प्रकाराला जबाबदार आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा संपुर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देवगड तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

यावेळी देवगड एस. टी. स्टँड येथून तहसीलदार कार्यालय देवगड पर्यंत मोर्चा काढण्यात आला व शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. येथील देवगड तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, विशाल मांजरेकर, प्रसाद दुखंडे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात अतंरवली-सराठी (ता.अंबड जि.जालना) मराठा बांधव मराठा समाजाच्या वर्षानुवर्षाच्या मागणीसाठी अतिशय शांततापुर्ण मार्गाने उपोषण करीत होते. मराठा समाजाने आतापर्यत अनेक आंदोलन केली. लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले परंतु कधीही चुकीचे पाऊल उचलले नाही. मात्र, असे असताना जालन्यात शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याच्या हेतुने पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. गोळीबार करण्याची देखील केला. मराठा आंदोलकांवर अत्याचार करण्यात आले आहेत. मराठा समाजावर लाठीचार्ज, गोळीबार कुणाच्या आदेशावरून केला. हे स्पष्ट व्हायला हवे. ज्या अधिकाऱ्यांने हे सर्व करण्याचे आदेश दिलेत. या प्रकाराला जो अधिकारी जबाबदार आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मराठा समाजाची मागणी आहे.मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावेत. जालन्यातील प्रकाराचा आम्ही निषेध करतोच परंतु जर शासनाने आमच्या मागण्यांच्या विचार केला नाही, तर राज्यातील सकल मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील देण्यात आला आहे.