जय हिंद कॉलेजचा 'वृक्ष संवर्धन आणि जतन' उपक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2025 17:18 PM
views 68  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्सने पर्यावरण रक्षणासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून, त्या झाडांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. रक्षाबंधनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या उपक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांनी ज्या झाडांना राखी बांधली, त्यांची निगा राखण्याची आणि त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे. झाडे लावण्यापेक्षा ती जगवणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले तरुण भारत संवादचे तालुका प्रतिनिधी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. संतोष सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्षसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजना आणि वृक्षतोड बंदीचा संदर्भ देत, त्यांनी तरुणांना नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबरच निसर्गाची काळजी घेतल्यास जीवन अधिक सुखकारक होईल, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे सीनियर एक्झिक्युटिव्ह, प्रवीण कुमार प्रभू केळुसकर यांनी भूषवले. कोकणात नैसर्गिक संपत्ती भरपूर असूनही तिचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावून त्याचे जतन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, विद्यार्थ्यांनी वृक्षांना आपला भाऊ मानून रक्षाबंधनाच्या निमित्ताने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयूर शार बिद्रे यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वृक्षतोडीबद्दल चिंता व्यक्त केली. यामुळे पशुपक्षी मानवी वस्तीत येत असून, आपण त्यांना खाद्य देणाऱ्या झाडांची लागवड केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडीने झाली, ज्यातून संपूर्ण गावात पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य अमेय महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षद धुरी यांनी केले, तर मनाली सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.