लेखन हा माझा श्वास : डॉ. शरयू असोलकर

'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!
Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2024 11:13 AM
views 41  views

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष सदर आम्ही घेतोय. याच्या सतराव्या पुष्पात 'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' काव्यसंग्रहाच्या लेखिका, मुंबई विद्यापीठाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापिका तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्य पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त कवयित्री डॉ. शरयु आसोलकर यांची खास मुलाखत आपल्या समोर घेऊन येत आहोत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर व कोकणसादचे प्रतिनिधी विनायक गांवस यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत‌

पुष्प १७ वं.

१.  तुम्ही कविता, समीक्षा, ललित लेखन अशा विविध स्वरूपाचे लेखन केलं आहे. साहित्याकडे तुम्ही कशा वळला ? तुमच्यावर साहित्य संस्कार कसे झाले ?

जन्म, शिक्षण, बालपण सावंतावडीतच झालं. शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतलं. नंतर वि.स.खांडेकर विद्यालयात, मिलाग्रीस हायस्कूल व कॉलेज जीवनात पंचम खेमराज महाविद्यालयात शिक्षण घेतलं. शालेय जीवनापासूनच लिहायला लागले. माझ्या वडीलांना लिहिण्याची, वाचण्याची आवड होती. ते पत्रकार होते. समाजकारणातही त्यांचा सहभाग होता. त्यांच्यामुळे वाचन, लेखनाची आवड आम्हाला लागली. आमच्याकडून देखील ते वाचन, लेखन करून घेत. त्यातूनच माझा हात लिहीता झाला. निबंध लेखनात मला रस होता. गद्य लेखनापासून मी सुरुवात केली. शालेय जीवनात माझ्या शिक्षकांच आकस्मिक निधन झाल. तेव्हा त्यांच्यावर मी लेख लिहीला होता. तो लेख विशेषांकात प्रकाशित झाला होता. माझं ते पहिलं लेखन होत, तिथून लिहीत गेले. कवींतांच्या हस्तलिखितांच शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते शालेय जीवनात प्रकाशन केलं. लेखनाच लहानपणी खूप कौतुक झालं. आईला देखील कवितांची आवड होती. आजही तिच्या कविता पाठ आहेत. त्यामुळे सुर,लय,ताल याचे संस्कार घरातूनच झाले. आई-वडीलांमुळे साहित्य संस्कार आम्हा भावंडांवर झाले. रेडिओमुळे श्रवणसंस्कार झाले‌.


२. कविता अधिक जवळची का ?

पंचम खेमराजमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण घेतलं. यावेळी कवीवर्य डॉ.वसंत सावंत यांचं अध्यापन मला लाभलं. यावेळी कवी, अंतर्बाह्य कवी असणं म्हणजे काय ? हे त्यांना बघूनच समजत होत. त्यांना बघणं हा हे वेगळा अनुभव होता. ते सतत कवितेत असायचे. कवितेवरील अभिप्राय देखील ते घेत. त्यांनी सुरु केलेल्या कोजागिरी कवी संमेलनामुळे व्यासपीठ मिळालं. कार्यक्रमांना वक्ते आले की वडील आम्हाला घेऊन जायचे. वसंत सावंत सरांमुळे अनेक साहित्यिकांना आम्हाला भेटता आलं. मंगेश पाडगांवकर, विं.दा. करंदीकर, बा.भ.बोरकर, आनूराधा पाटील आदींना आम्ही या कविसंमेलनात ऐकलं. हा न विसरता येणारा अनुभव होता. कथा लेखनही मी करत होते. एम. ए.ला गेल्यानंतर कविता सदरांमधून प्रसिद्ध होऊ लागल्या.  नियतकालिके, दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झाल्या.


३. कोणत्या प्रकारची कविता अधिक आवडते ?

त्यावेळी गझलचा काळ होता. सुरेश भटांचा प्रभाव होता. गझलची कार्यशाळा ते घ्यायचे. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही मात्र, पत्रव्यवहार होता. त्यांनी जो गझल संग्रह काढला त्यामध्ये माझी गझल घेतली होती. माझ्या कवितासंग्रहात देखील काही गझलांचा समावेश आहे. काहीकाळ ते मी लेखन केलं. कवितांचं मुळात आवडत असल्यान सगळ्या कविता प्रकारात लेखन केलं ते आजमावून पाहिलं.


४. 'तुटलेपण पुन्हा बांधून घेताना' या काव्यसंग्रहाच नाव इतर काव्यसंग्रहापेक्षा थोडं वेगळं आहे. मराठीतील आज लिहिल्या जाणा-या स्त्रियांच्या कवितेपेक्षा तुमची कविता कोणत्या बाबतीत वेगळी आहे असं वाटतं ?

जे आपण अनुभवतो ते कवितेतून उमटत असत. आपसूकच कविता येत जाते. प्रभावही आपल्यावर काहीकाळ आसतो, त्यातून बाहेरही पडाव लागत. आवडणाऱ्या कवितांत इंदिरा संत, जनाबाईंचा विद्रोही सुर होता. माझ्या कवितांत स्त्रीयांच्या जगण्यातील सोशीकपणा, समंजसपणा हा भाग आला आहे. वेगळ्या अंगानं मांडणी केली तर ती अधिक प्रभावी होऊ शकते. 


५. तुम्ही कमी लिहीता अशी एक वाचकांची तक्रार आहे. त्याबद्दल काय सांगाल. लिखाण प्रसिद्ध करत नाही का ?

मी कमी लिहिते हे खरं आहे. पण,  कविता लिहीत असते‌. प्रसिद्ध अधिक करत नाही. दुसरा काव्यसंग्रह आता येईल लवकरच माझी बहीण ज्ञानदामुळे हे सगळं होतय. मी लिहीते पण प्रसिद्ध नाही करत. आताच्या काळात प्रसार माध्यम अधिक आहेत पण तिथवर जाण माझ्याकडून होत नाही. जिथं शक्य आहे तिथे प्रसिद्ध करते. पण, कविता लिहीत नाही असं नाही. माझ्यासाठी लिहीत रहाणं हा श्वास आहे‌.


६. तुम्ही आजवर अनेक कविता लिहिल्या आहेत. अन्य लेखनही केले आहे. त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.

लिहायचं पुष्कळ आहे. ललित लेखन करायचे आहे. ते मला लिहायला आवडतं. गद्य लेखन हे कवितेच्या अंगान जात असं म्हणतात. ते टाळून लिहायचा प्रयत्न आहे. लिहायचं पुष्कळ आहे. आजवरचा प्रवास, आठवणी लिहीण, त्या लिहून पहाण हा उद्देश आहे. शिक्षक व्हायचं हे ठरवलं असल्यानं पुढे प्रवास सुरू झाला. भाषा, साहित्य याचा आनंद घेता आला. माझ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर यश मिळवलं. भाषा,  साहित्य संबंधित अनेक उपक्रम आम्ही राबविले. आताच्या काळात थोडे बदल झालेत. विद्यार्थ्यांचं लेखन, वाचन मंदावलेल दिसत. त्याला चालना देण मोठं आव्हान आहे. त्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवितो. चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा मिळतो. त्यांना पाठबळ देण आवश्यक आहे. 


७.कविता लेखनासह समीक्षालेखन, पुस्तक परीक्षण, ललितलेखन आपण केलय. संशोधनात्मक लेखन आपण केलय. लेखनाचा आपला अनुभव कसा होता ?

एम.ए., नेट पास झाल्यानंतर मला जेआरएस मिळाली होती. नोकरी स्वीकारा किंवा संशोधनासाठी विद्यापीठात रूजू व्हा असा पर्याय होता. नोकरीची आवश्यकता असल्यानं तो निवडला. पण, संशोधनाचा विषय होता. अध्यापन, नोकरीमुळे ते थोडं मागे पडलं. माझे मार्गदर्शन राजन गवस यांनी रंगनाथ पठारे यांच्या कथात्मक साहित्याचा विषय मला सुचवला. तेव्हा त्यांचं लिखाण वाचले होते. त्यावर संशोधन करणं आव्हानात्मक वाटलं. त्यामुळे हा प्रबंध पुर्ण केला. कादंबरीकार म्हणून रंगनाथ पठारेंची त्यांची वेगळी लेखनशैली आहे. अभ्यास करताना वेगळ्याप्रकारच समाधान मला मिळालं. फार मोठा आवाका असलेलं त्यांचं लेखन आहे. भाषेचे विविध प्रयोग त्यांनी केले आहे. 'अनुभव विकणे आहे' हे त्यांचा एक कथासंग्रह होता. सतत लिहित्या असणाऱ्या लेखकावर संशोधन करणं हा आनंदाचा भाग असतो‌. माझ्यातही खुप बदल या संशोधनान झाले. बघण्याची दृष्टी व्यापक झाली. माझ्या आयुष्यातील आनंदाचा असा हा संशोधनाचा काळ होता.


८.कवितेच्या अभ्यासक म्हणून आजच्या मराठी कवितेविषयीची निरीक्षणे काय ?

आताच्या पिढीत कवितेच लेखन जास्त आहे. कथा, कादंबरी दीर्घ लेखन करताना तसं कुणी दिसत नाही. स्नेहा कदम, सरिता पवार अशी नावं दिसत आहेत. त्यांना अजून बरीच वाटचाल करायची आहे. आत्ताचा काळ देखील स्थित्यंतराचा आहे, पुढे काय ? असे काही प्रश्न समोर आहेत. फारशी नाव दिसत नाहीत. परंतू, कोकणात चांगली कविता लिहीली जाते. अग्रस्थानी असणारे कवी आपल्या जिल्ह्यात आहेत. आता लिहिणारी पिढी देखील पुढे येईल असं वाटतं.

 

९. भाषा, संस्कृती, साहित्याचं भविष्य काय ?

मी आशावादी आहे. असा एक काळ येतोच. मराठी टिकेल हा प्रश्न शंभर वर्षांपूर्वीचा आहे. पण, आजही ती टिकून आहे. तीच स्वरूप बदलत. मराठी ही लवचिक व सर्वसमावेशक भाषा असल्यानं ती बदलासोबत टीकून राहील. मराठीला मोठा वारसा, परंपरा आहे. भाषेविषयी आस्था, प्रेम आजही जिवंत आहे. त्यामुळे मी आशावादी आहे. वाचन ही गोष्ट कमी होत आहे. ते झालं तर 'वाचाल तर वाचाल' त्याप्रमाणे होईल.


१०. तुम्हाला भावलेले साहित्यिक कोणते ?

कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, मर्ढेकरांपासून मागच्या पिढीतल सगळेच कवी त्यांच्या कविता आवडतात. आजच्या पिढीतील जिल्ह्यातील कवी चांगलं लिहितात. प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, अनिल कांबळी हे एकाचवेळी लिहीणारे असले तरी त्यांच्या प्रत्येकाची कविता वेगळी आहे. बालकवीतेचा विचार केला तर हरिहर आठलेकर आदींचा समावेश आहे. माझी बहीण ज्ञानदा देखील लिहीते आहे. बहीण म्हणून नाही पण बाल साहित्य निष्ठेने लिहित असल्यानं तीची कविता मला भावते.