खडू, बोरू, टाक ते जेल !

पेनसंप्रदायाचे वारकरी - आनंद शेट्ये ; पुष्प : ३९ वं.
Edited by: विनायक गांवस
Published on: July 13, 2024 15:09 PM
views 73  views

'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा'

आनंद आशालता काशिनाथ शेट्ये

(शेतकरी, उद्योजक, लेखक)


कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' व कोकणचं नं. १ महाचॅनल 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष मालिका सुरु करण्यात आली आहे. साहित्यक्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्या त्यामध्ये मुलाखती घेण्यात येत आहेत. या विशेष मालिकेच्या ३९ व्या पुष्पात 'मुक्काम खानयाळे' साठीसत्तरीच्या दशकात कोकणात जन्मलेल्या पिढीची 'संघर्षगाथा' या पुस्तकाचे लेखक तथा प्रतिथयश उद्योजक व हाडाचे शेतकरी आनंद आशालता काशिनाथ शेट्ये यांची 'कोकणसाद'चे संपादक संदीप देसाई यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.


१. मुलाखतीच्या सुरूवातीलाच आपल्या 'आनंद आशालता काशिनाथ शेट्ये' या नावाविषयी जाणून घ्यायला आवडेल.

नाव लिहिण्याची साधारण पद्धत बघता आपलं नाव, वडीलांच नाव व आडनाव असा एक लिखाणाचा प्रघात असतो. मात्र, सुरुवातीपासून आईचं नाव सुद्धा यात असावं असं मला वाटायचं. त्यामुळे गेली अनेक वर्षे लेखनात असेल तसेच जिथे शक्य असेल तिथे आईचं नाव देखील मी नावामध्ये लिहीतो. मातृ देव भव, प्रथम गुरु आई असते त्यामुळे ते नाव प्रत्येक ठिकाणी लिहीतो. नुकतच महाराष्ट्र सरकारने देखील तसा निर्णय घेतला आहे. नावामध्ये आईचं नाव देखील असावं असा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, मी हे गेली अनेक वर्षे करत आहे.


२. आपण शेतकरी, उद्योजक म्हणून कार्यरत असताना साहित्याच्या मशागतीकडे कसे वळला ?

मला वाचनाची आवड होती. शालेय जीवनात अनेक पुस्तके वाचली. भेडशी शाळेतील शिक्षकांमुळे वाचनाची आवड मला लागली. हे वाचनाच वेड पुढे कायम राहिलं. यातूनच लेखनाचा प्रवास पुढे सुरू झाला. शालेय जीवनात काही कवितांच लेखन देखील मी केलं होतं. शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळत गेल्यानं पुढे मी लिहू लागलो. 'मुक्काम खानयाळे' हे माझं पहिलं पुस्तक आहे. साठी-सत्तरीच्या दशकातील कोकणच्या पिढीची संघर्षगाथा यामध्ये आहे. 


३.तुमच्या दृष्टीकोनातल पन्नास वर्षापूर्वीचं कोकणातील जीवन कसं होतं ?

त्या काळातील पिढी ही शेतीवर आधारित होती. शेती हा एकमेव व मुख्य व्यवसाय होता. यावेळी आईवडिलांना वाटायचं की आपली मुलं शिकली पाहिजे, नोकरीधंद्याला लागली पाहिजे. शहराच्या ठिकाणी गेली पाहिजे यासाठी खुप मोठा संघर्ष करावा लागत होता. हा संघर्ष आमच्या पिढीनं, आमच्या मागच्या पिढीनं केला. आमच्या वडीलधाऱ्या पिढीन शिक्षणासाठी प्रेरीत केलं नसतं तर हे आसमंत पेलण आज शक्य झालं नसतं. आज आपण बालशिक्षण, बाल मानसशास्त्र म्हणतो या सर्व गोष्टी बाजूला आहेत. आत्मनिर्भर आदी शब्द देशाच्या उन्नतीसाठी आज वापरले जातात. आत्मनिर्भर भारत घोषणा आज झाली असेल मात्र, हा शब्द आमच्या आई-वडीलांना चांगला कळला होता. शाळेत असताना शेत नांगरण्यापासून, गुर राखण्यापर्यंत सगळी कामं त्याकाळात प्रत्येक मुलाला करावी लागायची. त्यामुळे ते मुलं प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आत्मनिर्भर होऊनच बाहेर पडायचे. शेती ही माझी आवड होती. मात्र, त्यावेळी पैसा नव्हता. अशावेळी मुंबईचा आधार मला घ्यावा लागला. मुंबईला आलो तरी शेती करण्याची इच्छा मनातून मालवली नाही. गेली २० वर्ष मी गावी येऊन शेती करतो. दर महिन्यातून आठ दिवस मी कोकणात असतो. मेहनत आणि सातत्य कोणत्याही क्षेत्रात आवश्यक असतं. शेतकरी कुटुंबातून आल्यानं हे संस्कार माझ्यावर होते. त्यामुळेच आजही मी शेतकरी म्हणून माझी ओळख करून देतो. 'मी शेतकरी' असा ब्रॅण्ड गाडीच्या मागच्या काचेवर मी लिहीला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी असल्याचा अभिमान असावा. 


४.'मुक्काम खानयाळे' साठीसत्तरीच्या दशकात कोकणात जन्मलेल्या पिढीची 'संघर्षगाथा' या आपल्या पुस्तका विषयी काय सांगाल ?

'मुक्काम खानयाळे' हे तत्कालीन समाज, संघर्ष व त्यावेळीच्या जनरीती व आजच्या जीवनमानात त्याची होणारी तुलना याच एक समालोचन आहे. कोकणातील, महाराष्ट्रातील तत्कालीन ग्रामीण व्यवस्थेच ते प्रतिनिधित्व आहे. त्याकाळीही संघर्ष व स्पर्धा या गोष्टी होत्या. पण, त्याची परिभाषा ही नितीमूल्यांच्या आधारीत होती‌. समाजाला धरून राहीलं पाहिजे अन्यथा आपण दूर फेकले जाऊ ही भिती त्यावेळी होती. एकत्र कुटुंब पद्धती शिल्लक होती‌. पैसा ही गरज होती पण ते सर्वस्व नव्हतं. देव, धर्म, नातीगोती, समाज, माणूसकी, शेजारधर्म, पाहुणे, जाणते आणि 'लोक काय म्हणतील ?' अशा अनेक गोष्टी समाजजीवनाचे मापदंड होते. अशा या समाज व्यवस्थेवर केलेल भाष्य या पुस्तकात आहे. आर्थिक  उन्नतीसाठी जो-तो शहराकडे आला अन् तिथेच स्थिरावला. याआधी असं नव्हतं, तो नोकरदार निवृत्तीनंतर गावी यायचा. कुटुंब गावीच असायच, सणासुदीच्या काळात गावाकडे नोकरदार यायचा, त्यात धन्यता मानायचा. गेल्या २५ वर्षात हे चित्र बदललं आहे. लोकांकडून शेतजमीनी विकल्या गेल्या. परप्रांतीयांनी त्या खरेदीकरून व्यवसायिक शेती केली. त्यांनी साधलेला आर्थिक विकास आपल्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे. आजच्या नव्या पिढीला ती जाणीव होत आहे. ही पिढी पुन्हा शेतीकडे वळत आहे. 


५. 'खडू, बोरू, टाक, फौंटनपेन, बॉलपेन ते जेलपेन पर्यंत असंख्य पेनसंप्रदायाचे तुम्ही स्वतःला वारकरी संबोधता. यामागच विशेष कारण काय ?

आमच्या शालेय जीवनात पाटी आणि खडू असायचा. चौथीपर्यंतचा अभ्यास आम्ही तसा केला. आताच्या चैनी तेव्हा न परवडणाऱ्या होत्या. आठ-दहा मुलांमध्ये एक छत्री असायची. आमच्या आयुष्यात पहिली लेखणी आली ती खडू अन् दुसरी बोरू. कित्ता लिहिण्यासाठी दौत होते. नंतर टाक, पेन, बॉल पेन, जेलपेन पर्यंत अनेक पेन आली. हे सगळं बघताना बोरूची आठवण नेहमी येते. बोरून लिहीणं कधी जमलं नाही. माझा कित्ता नेहमीच बरबटलेला असायचा. या प्रवासातील अनेक आठवणी आहेत. त्या मनात शिल्लक राहतात‌‌. माणूस वर्तमानात व्यथित होऊन बघत असतो. भविष्याच्या चिंतेत असतो, जगतो मात्र भुतकाळात. माझं तसंच आहे, मी भुतकाळात रमतो.


६.जादूई नगरी 'मुंबई' आणि पृथ्वीवरच स्वर्ग 'गाव' या दोन्हीचा सहवास तुम्हाला आहे. अधिक मन कुठे रमतं ?

आजमितीला जगातले ४० देश मी फिरलो आहे. आजही ही भटकंती सुरु आहे. ५० देश बघण्याचा माझा संकल्प आहे. या प्रवासात मला भावलेल ठिकाण कोणतं असेल तर माझं कोकण, माझं गाव खानयाळे. त्यासारखं सौंदर्य मला कुठेही दिसलेल नाही‌. नंतर स्वित्झर्लंड, जपान या ठिकाणांच नाव घ्यावं लागेल. अर्थकारण महत्वाच आहे. पण, फावल्या वेळात किमान आठ दिवस मी कोकणात येतो. सुरूवातीच्या काळात कोकणात येण शक्य नव्हतं. तेव्हा कोकणातून मुंबईला येणाऱ्या गाडीवर बसलेल्या धुळीचा सुगंध मी घ्यायचो‌. माझ्या मातीचा सहवास तिथे मिळायचा. माती विषयीची ती ओढ होती. आता अनेक सुविधा झाल्यानं काही क्षणात कोकणात येता येत. कोकणात आल्यावर आपलेपणा जाणवतो. 


८. शेतकरी म्हटलेलं अधिक भावतं की उद्योजक ?

उद्योगात मेहनत आणि सातत्य लागत. माझ्यामते ते शेतीतूनच मिळत. मला ते तिथूनच मिळाल. त्यामुळे प्रथम मी शेतकरी आहे‌. नंतर मी इतर. शेतकरी ही उपाधी माझ्यासाठी अभिमानाची आहे. 


९.आगामी लेखना विषयी काय संकल्प ?

ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाच प्रकाशन झालं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते, हे पुस्तक पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, त्यांच्यासाठी तो संग्रह ठरेल. यापुढे मी व्यवसायिक जीवनावर लिहायचं ठरवलं. लवकरच 'नसते उद्योग' हे पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. ३२ वर्षांच्या व्यवसायिक वाटचालीच्या अनुभवातून ते लिहीलं आहे. पुढील पिढीन काहीतरी शिकाव व उद्योजक बनाव‌ यासाठी ते लिहीलं आहे. तर 'माझी भ्रमंती' हे आणखीन एक पुस्तक प्रकाशित होणार आहे. यामध्ये भेडशीतील पांडूच्या हॉटेलमधील भजीपासून ड्रोनाल्ट ट्रम्प यांच्या अमेरिकेतील हॉटेल पर्यंतचा प्रवास उलगडला जाणार आहे. तेथील माणसं, विचार, सामाजिक जडणघडण यावर आधारीत हे पुस्तक असणार आहे. 


१०.नव साहित्यिकांना, कोकणातील युवकांना सांगाल ?

कोकणसाद मी रोज वाचतो. त्यातून माझ्या गावातील बातमी मला मिळते. या माध्यमातून मी रोज सकाळी कोकणात पोहचतो. कोकणातील तरूण पिढीकडे कौशल्य आहे, उर्जा आहे. मात्र, सरकारने मला नोकरी द्यावी, मग मी उन्नती साधेन यातून बाहेर पडलं पाहिजे. हजारो संधी आपल्यासमोर आहेत. सोशल मीडियासारख दुधारी हत्यार आहे.  त्याचा वापर कसा करावा हे आपल्यावर आहे. केवळ पदवी मिळवून नोकरी मिळवण्याचा अट्टाहास सोडून द्यावा. चाकरमानी या शब्दातून बाहेर पडून नोकरी देणारं बनलं पाहिजे.   


छाया - प्रसाद कदम 

शब्दांकन - विनायक गांवस