'खाकीतला कवी'' निसर्ग ओतारी !

पोलीस निरीक्षकांची विशेष मुलाखत
Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2024 17:04 PM
views 56  views

साहित्यरत्न भाग - ३५


कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनेल कोकणसाद LIVE च्या 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा' या विशेष सदरातून ''सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' हे ब्रीदवाक्य घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या, धकाधकीच्या जीवनात आपला छंद  जोपासणाऱ्या कवी मनाच्या साहित्यिकाची मुलाखत आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. दोडामार्ग तालुक्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचा हा साहित्यप्रवास दै.कोकणसादचे संपाद‌क संदीप देसाई व प्रतिनीधी विनायक गांवस यांनी या विशेष मुलाखतीतून उलगडला आहे.


कवी निसर्ग ओतारी, मुलाखत


पुष्प - ३५ वे


वर्दीतील माणूस साहित्यिक कसा झाला ?

कवी असण्यासाठी संवेदनशील असावा लागत. देवान मला संवेदनशील मन दिलं त्यासाठी त्याचे आभार मानतो. आध्यात्माचा विचार जोपासणाऱ्यांपैकी मी एक आहे. चांगले विचार, संस्कार आचरणात आणण्याचा मी प्रयत्न करतो. लेखनाच बीज महावीर महाविद्यालयात पेरल गेलं. पहिली कविता 'चष्मा' या व्यंगात्मक स्वरूपात मी लिहीली होती. येथूनच खऱ्या अर्थानं कविता लेखनाची सुरुवात झाली. नंतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करू लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रभावी काव्य लिहावं ही तीव्र इच्छा माझी होती. २०२२ ला क्राईम ब्रॅन्च मुंबईला कार्यरत असताना हे काव्य मी लिहायला घेतलं. दोन ते चार पानी काव्य महाराजांच्या जीवनपटावर लिहिलं. 'शिवबाचा यल्गार' असं नाव त्याला दिलं. अनेकांनी त्याच कौतुक करताना लिहीण्यासाठी प्रोत्साहन दिलं. याच रूपांतर नंतर पोवाड्यात केलं गेलं. हा पोवाडा संगीतबद्ध करून पाच भागांत त्याच चित्रीकरण करून तो प्रसारीत करण्यात आला. शिवरायांचा पराक्रम पोवाड्यातून मांडला.


पहिला काव्यसंग्रह'सप्तरंग' विषयी काय सांगाल ?

शिवाजी महाराज हे माझे प्रेरणास्थान आहेत. म.फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ‌.शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. त्यामुळे माझ्या लेखनात सामाजिक भावना अधिक आहे. पोलीस खात्यामुळे माझा अनुभव व वेगळा दृष्टिकोन मिळाला. वेश्याजीवन, मुलींची छेडछाड, गर्भपतन, अर्धनारी नर आदी संवेदनशील विषयावर काव्य लेखन केलं आहे. 


 'पोलीस' कवितेविषयी जाणून घ्यायला आवडेल.

पोलीसांच्या जीवनात म्हणायच झालं तर आम्ही स्वतःच जीवन जगतच नाही. पोलीसांच जीवन हे लोकांसाठी आहे. आमचा वेळ हा समाजासाठी देतो. पोलीस कवितेतून मी माझ आत्मकथन मांडल आहे. लोकांचा पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन, पोलीसांच्या समस्या यावर कवितेतून भाष्य केलं आहे. अनेकांना सेवा देताना मृत्यू गाठतो. परंतू, त्यांना शहीद म्हंटले जात नाही. त्यांची दखल घेतली जात नाही. पोलिसांची कुठली संघटना नाही. त्यांना कधी आवाज उठवता येत नाही व तो उठवूही नये. पोलीस हे शिस्तप्रिय खात अन् आपत्कालीन सेवा देणार आहे. मात्र, पोलिसांच्या समस्यांची जाणीव समाजाला असणं आवश्यक आहे. शासकीय खात्यात अधिकची ड्युटी लागली की विविध संघटना आपली नाराजी व्यक्त करतात. पोलीसांच्या बाबतीत असं नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की, पोलिसांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन सहानुभूतीपूर्वक असावा. कित्येक पोलीस निवृत्तीनंतर जास्त दिवस जगत नाहीत. शासनावर पेंशनचा भार जास्त काळ राहत नाही. हे पोलिस खात्यातील वास्तव आहे. ताणतणाव, आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे जास्त काळ पोलीस जगत नाहीत असं चित्र सध्यस्थिती आहे. अनेकांना 'ऑन ड्युटी' हार्ट अटॅक येण्याचे प्रकार वाढले आहेत. याबद्दल थोडं जागृत राहून पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. काही लोकांमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन तसा करू नये. पांढऱ्या कागदावरचा काळा डाग म्हणजेच पूर्ण कागद अस नाही. काळ्या डागालाच संपूर्ण कागद समजलं जात आहे. पोलीस खात्यात खूप चांगल व प्रामाणिक काम करणारी माणसं आहेत. जी प्रसिद्धीपासून वंचित राहिली आहेत अशी वस्तुस्थिती आहे.


*'पोवाडा' लेखन आपण करता. 'शिवबाचा यल्गार' विषयी काय सांगू इच्छिता?*

शिवाजी महाराजांच कार्य प्रभावीपणे व कलात्मक पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केला. यात मी यशस्वी झाल्याची माझी भावना आहे. ''छत्रपतींचा जयजयकार, हरहर महादेवची ललकार....'' अशाप्रकारे महाराजांचा पराक्रम, जुलमी राजवटीचा इतिहास अन् महाराजांनी केलेली स्वराज निर्मिती याच वर्णन यातून केलं आहे. 


कवी मनाच्या खाकी वर्दी विषयीची काय भावना ?

मी एक भाग आहे. माझ्यासारखे अनेक जण पोलीस खात्यात आहेत. गायन, लेखन, नृत्याविष्कार, अभिनय, क्रिडा क्षेत्रात पोलीस उल्लेखनीय कार्य करत आहेत. माझा आवडता विषय इतिहास असल्यानं पोवाड्याला शाब्दिक धार आलेली आहे. वाचनाचा फायदा लेखन करताना होतो. 


दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. यात कोणता विषय हाताळला ?

विविध सामाजिक विषयांवर यातुन भाष्य केलं आहे. महिलांच्या जीवनावर 'स्त्री' नावाची कविता यात आहे‌. स्त्री जीवन मांडल आहे‌. चुल आणि मूल या पलिकडची स्त्री मांडली आहे. पोवाड्यांवर ऐतिहासिक लेखनावर अधिक भर दिला आहे‌.


'स्वराज्याचे हिरे' संकल्पना काय आहे ?

सातवीर पोवाडा लिहिला आहे‌. स्वराज्याचे हिरे ही पोवाड्यांची मालिका सुरू करत आहे‌. शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीत साथ देणाऱ्या मावळ्यांवर हे पोवाडे आहेत. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर तसेच सोबतच्या सात वीरांवर रचना केली आहे. लवकरच ते लोकांच्या भेटीला येईल. 'स्वराज्याचे हिरे' मधून मावळ्यांच बलिदान, त्याग लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. बहिर्जी नाईक यांच्यावर देखील रचना करत आहे‌. त्यांचही कार्य खूप मोठं आहे. हेर खात्यांनी त्यांच्याकडून बोध घेतला आहे. वर्षांनुवर्ष त्यांनी आपली कुटुंब बघितली नाहीत. शिवाजी महाराजांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्यावर पोवाडा लेखन करत आहे‌. यासह स्वराज्य निर्मितीत बलिदान देणाऱ्या हिऱ्यांवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे.


पोलीस म्हणजे व्यस्त, ऑन ड्युटी २४ तास ! साहित्याला वेळ कसा देता ?

वास्तविक वेळ काढावा लागतो. सामाजिक जबाबदारी मानून लोकांमध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी या हेतूनी मी लेखन करतो. दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न आहे. संत, समाजसुधारकांचे विचार येणाच्य पिढीपर्यंत पोहोचावेत यासाठी वेळ काढला जातो. अन् लेखनाचा छोटासा प्रयत्न करतो‌‌. पोवाडा लेखन करण्यासाठी कोल्हापूरची मातीच कारणीभूत आहे. इतिहास माझा आवडता विषय होता. बाजीप्रभूंचा इतिहासही कोल्हापूरचा आहे. त्यामुळे ती प्रेरणा यातून मिळते. त्यांच्या त्यागासमोर आमचं कार्य शुल्लक आहे. 


गुन्हेगारी जीवन, पोलिस जीवन याकडे साहित्य म्हणून कसं पहाता?

सज्जनांच्या रक्षणासाठी व खलनिग्रहणासाठी पोलीस आहेत. कायद्याचा धाक ठेवावा लागतो. कर्तव्य बजावताना वैयक्तिक जीवन व कवीच मन बाजूला ठेवून कार्य बजावाव लागत. त्यावेळच्या परिस्थितीनुसार भुमिकेतून काम कराव लागत. कवी मन आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी संतुलन राखून सांभाळाव्या लागतात.


साहित्य क्षेत्रातील युवा पिढीसह एक पोलीस अधिकारी म्हणून काय संदेश द्याल ?

साहित्य व पोलीस अधिकारी म्हणून हाच संदेश देईन की, संवेदनशील रहा, लोकांच्या समस्या जाणून घेऊन शक्य तेवढी मदत करा. समाजाचा दृष्टिकोन बदलेल अशा गोष्टीला नव साहित्यिकांनी हात घालावा. समाजाचं लक्ष वेधलं जाव अस लेखन आपल्या हातून व्हावं यासाठी जबाबदारीनं पहावं. पूर्वजांचा वैचारिक वारसा पुढे जपावा.


शब्दांकन : विनायक गांवस