स्पष्टवक्ता 'साहित्यिक' अँड. नकुल पार्सेकर !

सुरेश प्रभू मोठं रसायन, पुस्तकातून प्रवास उलगडणार !
Edited by: विनायक गांवस
Published on: July 06, 2024 14:36 PM
views 128  views

  •   'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा'
  • पुष्प : ३८ वं.

कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' व कोकणचं नं. १ महाचॅनल 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष मालिका सुरु करण्यात आली आहे. साहित्यक्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्या त्यामध्ये मुलाखती घेण्यात येत आहेत. या विशेष मालिकेच्या ३८ व्या पुष्पात 'अटल वाटेवर चालताना' या पुस्तकाचे लेखक तसेच प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या 'माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवास' या पुस्तकाच्या लेखकाची विशेष मुलाखत घेण्यात आली. अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य अँड. नकुल पार्सेकर यांची 'कोकणसाद'चे संपादक संदीप देसाई यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत. 


गेली अनेक वर्षे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपण कार्यरत आहात. मात्र, आपल्या साहित्य क्षेत्रातील प्रवासाविषयी काय सांगाल ? साहित्याकडे कसे वळला ?

लहानपणी चांदोबा सारखी मासिक आवडीनं वाचायचो‌. त्या रहस्य कथा होत्या. काल्पनिक धार असल्यानं वाचण्यात वेगळी मजा होती. साहित्याची आवड निर्माण होण्याचं श्रेय कोकणभुषण स्व. विद्याधर भागवत यांना जातं. माझ्या ते गुरूस्थानी होते. मला त्यांनी मानसपुत्र मानलं होतं. १९८० च्या काळात जातीयता हा विषय अधिक होता. माझ्यासमोर अनेक विषय यायचे ज्यातून मी घुसमटल्यागत व्हायचो. व्यक्त व्हावं असं मला वाटायचं. अशावेळी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी म्हटल्याप्रमाणे 'कलम हे हत्यार तलवारी पेक्षा जास्त धारधार आहे' हे लक्षात आल्यावर मी 'नजरा-नजरा' ही पहिली कविता लिहीली. सहहेतूक, अहेतूक, प्रेम व तिरस्कार व्यक्त करणाऱ्या नजरांविषयी मी लेखन केलं. कॉलेजजीवनातील ही कविता एका अंकात प्रसिद्धीसाठी मी दिली. परंतु, ती कविता छापली गेली नाही. नंतरच्या काळात एसपीकेमध्ये मी प्रवेश घेतला. यावेळी कवीवर्य डॉ. वसंत सावंत यांनी आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत मी ती कविता दिली. माझ्या या कवितेला प्रथम क्रमांकाच ७५ रूपयांच पारितोषिक मिळालं. माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येणारा हा क्षण आहे. 


साहित्यातील अनेक दिग्गज मान्यवरांचा आपल्याला सहवास लाभला. कोणत्या आठवणी आहेत त्याबद्दलच्या?

कोमसापच्या स्थापनेनंतर मधुमंगेश कर्णीक त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोकणात काम करणारे विद्याधर भागवत यांच्याशी आम्ही जोडले गेलो. सुरुवातीच्या सदस्यांमधील आम्ही आहोत. यानंतर सावंतवाडी अखिल भारतीय अधिवेश घेण्याचं ठरलं. या अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रमाची जबाबदारी माझ्याजवळ होती.‌ या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर आले होते. त्यांच्याविषयी मोठ आकर्षण त्यावेळी होत. त्यांच स्वागत करण्याची संधी मला मिळाली होती. असंख्य साहित्यिक कार्यक्रम व्हायचे, अनेक दिग्गज या निमित्ताने सावंतवाडीत यायचे. यामुळे अनेक दिग्गजांचा स्पर्श, क्षणीक सहवास लाभला. या सहवासातून माझ्या शब्दांची धार प्रखर करण्यासाठी उर्जा मिळाली व हा छंद जडला.


कोणत्या प्रकारच साहित्य आपणास विशेष भावत ?

समाज माध्यम व डिजिटल मिडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. जुन्या ग्रामीण कथा बोधकथा होत्या‌. या दिशा देणाऱ्या, मार्ग दाखवणाऱ्या संस्कार कथा होत्या. सुमेधा देसाई यांच लिखाण पालकांना मार्गदर्शन करणार ठरत आहे. वाचनामुळे वैचारिक सुदृढता निर्माण होते. मात्र, त्याच्या अभावाचे परिणाम पावलोपावली आपल्याला जाणवतात. शाळांतील शिक्षकांचही अवांतर वाचन असण आवश्यक आहे. याचा उपयोग विद्यार्थांना होतो. सुधा मुर्तींच्या सहवासात मी होतो. देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्या आहेत. त्यांच्या साहित्याची निर्मिती वास्तव अनुभवातून झाली आहे. त्यांचे साहित्य महिलांना प्रेरणा देणार आहे. ग्रामीण कथा वास्तवावर अवलंबून होत्या. पूर्वीच्या साहित्य निर्मितीवर आज अनेक सिनेमे येत आहेत. जुनं साहित्य, जुन्या कादंबऱ्या खुप महत्वाचं ठरतं. कोकण ही रत्नांची भुमी असून अनेक साहित्यिक इथे घडलेत. 


बालकुमार साहित्य संमेलन, कोमसापच अखिल भारतीय संमेलन यात आपला सक्रीय सहभाग होता. संघटनेतही आजही कार्यरत आहात. काय सांगू इच्छिता ?.

माझा प्रवास अतिशय संघर्षमय आहे. ग्रामीण भागातून गरिबीतून पुढे आलेला मी दलित मुलगा. सावंतवाडी आणि अडकून पाडी याप्रमाणे मी सावंतवाडीकर झालो. रामराज्य असा उल्लेख महात्मा गांधी यांनी या शहराचा केला होता त्या सावंतवाडीचा मी झालो. इथल्या अनेक कुटुंबांशी मी जोडला गेलो. साहित्याविषयी कल्पना मला तिथून मिळायच्या‌‌. वाडेकर सर, स्व.प्रा. रमेश चिटणीस, आदींसारख्या लोकांकडून अनेक गोष्टी मी शिकलो. विचारांनी मी परिपक्व झालो. याचा उपयोग मी समाजासाठी करू शकलो. आज वैचारिक देवाणघेवाण हा विषय दुर्मिळ होत चालला आहे. 


कोजागरी कवितासंमेलनातील एखादा क्षण आठवतो का ?

सिंधुदुर्ग साहित्य संघाकडून या कवी संमेलनाचं आयोजन केलं जायचं. मी या संमेलनात एक वात्र टीका केली होती. पोस्टामध्ये मी त्यावेळी नोकरीला होतो. त्यावेळी केलेल्या या वात्र टीकेला रामदास फुटाणे उपस्थित होते. या वात्रटिकेला मला प्रथम पारितोषिक मिळालं होतं. यावेळी रामदास फुटाणे यांनी मला थांबू नका, लिहीत रहा असा संदेश दिला होता. 


कविता लेखनाविषयी काय सांगाल ? अनेक दैनिकातून त्या प्रकाशित झाल्यात.

काव्य शास्त्रापेक्षा कवितेतून संदेश जाण व तो वास्तवावर असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर मी एक कविता लिहीली होती. महिला सबलीकरणासारख्या थोतांडगारीपेक्षा महिलांना संरक्षण देण्यासंदर्भातील ती कविता होती. शेतकरी आत्महत्या, नवं शैक्षणिक धोरण या सारख्या विषयावर मी काव्य लेखन केलं आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करणं हा भाग नसून सरकारनं सर्वांर्थाने विचार करून सामाजिक परिणामांचा विचार करत धोरण जाहीर करणं आवश्यक आहे‌. यासाठी आजच्या साहित्यिकांनी त्यासंदर्भात जनतेचं प्रबोधन करण्यासाठी वास्तव मांडणं आवश्यक आहे.


शैक्षणिक, साहित्य क्षेत्रात कार्यरत असताना विधी क्षेत्राकडे कसे वळला ?

मी एम.एस.डब्ल्यू केलं होत‌. सिंधुदुर्गतील अनेक दिग्गज मंडळी माझ्यासोबत होती‌. त्यावेळी अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीवेळी एल.एल.बीची अट होती. यासह आपल्याकडे कायदेशीर न्याय असावं हा माझा हेतू होता. कमर्शियल दृष्टीकोनातून नव्हता. सावंतवाडी पोलिस ठाण्यात समुपदेशन केंद्र आम्ही चालवत आहोत. महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे. यामाध्यमातून अनेकांना कायदेशीर सल्ला देणं, मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करत आहोत. अनेकांचे संसार उद्धवस्त होण्यापासून आम्ही वाचवले आहेत. ही गोष्ट आमच्यासाठी समाधान देणारी आहे. यावेळी कायदेशीरबाब निर्माण झाली. स्वतःकडे कायदेशीर न्याय असावं यासाठी विधी क्षेत्रात प्रवेश घेतला. २०१८ ला पहिल्या श्रेणीतून मी उत्तीर्ण झालो. कामगार क्षेत्रात देखील मी काम केलं आहे. 


'अटल वाटेवर चालताना' या पुस्तका विषयी काय सांगाल ?

मी नोकरीचा राजीनामा दिला तो भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी दिला होता. संघ परिवाराच्या संघटनांचा मी युआर होतो. माधव भंडारी भाजपचे जिल्हाध्यक्ष असताना मी चिटणीस होतो. त्यावेळी लालकृष्ण अडवाणींचा मोठा कार्यक्रम आम्ही सावंतवाडीत केला होता. अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना मी अधिक प्रभावीत झालो होतो. प्रमोद महाजन, सुरेश प्रभू, सुक्षमा स्वराज, मनोहर पर्रीकर, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे मी त्या प्रवाहात होतो. नंतर माझ्या लक्षात आलं किंवा माझ्या क्षमता कमी पडल्या असतील. यामुळे नंतरच्या काळात मी या प्रवाहातून बाजूला झालो. ज्यांनी देशाचं पंतप्रधान व्हावं असं वाटतं ते नितीन गडकरी, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आदींशीही माझा सहवास होता. त्यांच्यासोबत मी काम केलं आहे. हा सगळा प्रवास अटल वाटेवर चालताना मधून उलगडला आहे. आजही माझे नारायण राणे यांच्यासह सर्वपक्षीयांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. परंतु, चुकीचं असेल हे सांगताना मी कशाची तमा बाळगत नाही. कदाचीत हा माझा दुर्गुण असेल. 


सुरुवातीच्या काळात एका विचारधारेशी निगडित असणारे आपण आज मात्र परखड भूमिका घेताना दिसता. आजच्या राजकारणाकडे कसं बघता ?

मी स्वतःला समाजाचा प्रतिनीधी मानतो. राजकारणातील दुरावस्थेच प्रतिबिंब प्रत्येक घटकावर पडत आहे. आजच्या राजकीय लोकांना याच भान राहीलेलं नाही. सुरेश प्रभूंसारखा एखादा याला अपवाद असेल. आज निवडणूकांत मतदानासाठी पाकीट वाटपाचे प्रकार होतात. पाच हजार, तीन हजारांची पाकीट घरपोच होतात. मतदाना हे पवित्र दान आहे. आपली लोकशाही सुदृढ व प्रभावी आहे. याचं सगळं श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जात‌. त्यांनी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे मी तडफेनं बोलू शकतो. आजची राजकीय परिस्थिती दयनीय आहे‌. चुकीच्या पद्धतीने राजकारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महामानवांची नाव सोयीनुसार वापरली जातात. या महामानवांची नाव घेण्याची देखील आपली पात्रता राहीलेली नाही.


प्रकाशनाच्या वाटेवर असणाऱ्या 'माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवास' या लेखनाचा अनुभव कसा होता?

सुरेश प्रभू एक मोठं रसायन आहे. या माणसावर लिहायच म्हणजे खुप मोठं आव्हान आहे. ते आव्हान मी स्वीकारलं आहे. त्यांच्यासोबत मला मोठा सहवास लाभला आहे. जगातील विविध देशात सुरेश प्रभू गेलेले आहेत. तेथील प्रभावी लोकांशी त्यांचा सहवास आहे. मोठमोठ्या एनजीओ, विद्यापीठांशी ते जोडले गेले आहेत. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते निमंत्रित गेस्ट, रिस्युड विद्यापीठाचे ते चान्सलर आहेत. देशाच्या उर्जा, पर्यावरण, खत व रसायन, हवाई उड्डाण, वाणिज्य, रेल्वे, उद्योग आदी खात्यांचे ते मंत्री राहीले आहेत. हा सगळा त्यांचा प्रवास त्या पुस्तकातून उलगडला जाणार आहे.  


छाया : सचिन गोसावी 

शब्दांकन: विनायक गांवस