“धार्मिक तेढ” प्रकरणी जाफर शेख याला जामीन | तोडफोड प्रकरणी १३ जणांवर गुन्हे

Edited by: दिपेश परब
Published on: January 27, 2024 14:06 PM
views 332  views

वेंगुर्ले : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जाफर याकूब शेख याला ३ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज (२७ जानेवारी) वेंगुर्ले न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर संतप्त जमावाने केलेल्या तोडफोड प्रकरणी २०० ते २५० पैकी वेंगुर्ल्यातील १३ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे. 

दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा स्टेटस सोशल मीडियावर ठेवण्याच्या रागातून निर्माण झालेल्या वादामुळे मोठ्या संख्येने हिंदू बांधव २३ जानेवारी रोजी रात्री वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे गोळा झाले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी केली होती. याप्रकरणी २ अल्पवयीन मुलांसाहित रात्री उशिरा जाफर शेख याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. तसेच याचवेळी रात्री संतप्त जमावाकडून शहरातील दुकाने, हातगाडया फोडण्यात आल्या काही घरांवर दगड फेक करण्यात आली होती.

या प्रकरणी मनाई आदेशाचा भंग करीत बेकायदा जमाव करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी २०० ते २५० जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील १३ जणांचा शोध घेऊन त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून इतर जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव करत आहेत.