
महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती हा मर्दानी खेळ फार पूर्वीपासून खेळला जातो. भारतात प्राचीन काळापासून चालत आलेला हा एक क्रीडा प्रकार आहे. याआधी जत्रा, मेळावे यात गावोगावी कुस्त्या भरवल्या जात असत.आखाड्यात लाल मातीन माखलेले बलदंड शरीरयष्टीचे पैलवान शड्डू ठोकताना दिसत. सध्या ही कुस्ती ऑलिम्पिकमध्येही खेळली जाते. दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये हा खेळ खेळला जातो. डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता यात अत्यंत महत्त्वाची असते. यात अनेक डावपेचही असतात.
भारतातली कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. तर ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. 'महाराष्ट्र केसरी' ही महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा आहे. घाटमाथ्यावर कुस्तीला जितकं प्राधान्य दिलं जातं त्याप्रमाणात कोकणात तेवढं नाही. याचा अर्थ कोकणात पैलवान नाही, कुस्तीप्रेमी नाहीत असं मुळीच नाही. कोकणात देखील कुस्ती खेळली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९८५ पासून कुस्तीच्या स्पर्धा भरविल्या जायच्या. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी मैदानी खेळात कुस्तीही खेळायचे. पण, आता मैदानापासून विद्यार्थी दुर जात असल्याची भिती आहे. कुस्तीच बोलायचं झालं तर, खर्चिक बाब असल्यानं हा क्रिडा प्रकार बाजूला होत गेला आहे. त्याला म्हणावं तसं प्रोत्साहन मिळालं नाही. त्यामुळेच क्षमता असून देखील कोकणातील अनेक पैलवान पुढे येऊ शकले नाहीत. भारदस्त व्यक्तिमत्व व शरीरयष्टी मुळे 'काय पैलवान' ! एवढ्यापुरताच आमचा गडी मर्यादित राहिला. देश, राज्य पातळीवरील तो पोहचू नाही शकला.
पूर्वी तालमींना राजाश्रय होता. राजर्षी छ. शाहू महाराज यांनी कुस्तीला दिलेलं प्रोत्साहन तर विसरून चालणार नाही. तसंच आता याला लोकाश्रय देखील मिळायला हवा. सरकारनं देखील ही परंपरा जपण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विविध संस्थांनी, राजकीय नेत्यांनी काही पैलवानांना दत्तक घेण्याची गरज आहे. कारण, खुराकाचा खर्च अनेकांना न परवडणारा आहे. इच्छा असूनही खर्च परवडत नसल्यानंं कौशल्य असणारे अनेक पैलवान आपली गुणवत्ता दाखवू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यात त्या प्रमाणात सुविधाही इथं उपलब्ध नाहीत. सरावासाठी तालीम, मॅट यासारख्या गोष्टींचा अभाव आहे. मर्दानी खेळ असल्यानं त्याची गरज आहेच.अशा नानाविध अडचणी जिल्ह्यातील पैलवानासमोर आहेत.
लेडी पैलवानही मागे नाहीत !
कुस्तीसाठी तब्येत चांगली असायला हवी. चपळता, ताकद दोन्ही गोष्टी असायला हव्यात तरच मल्ल कुस्ती खेळू शकतो. अन्यथा मातीत लोळले जाल हे कुणा ज्योतिषानं सांगायला नको. दांडग्या शरीरयष्टी सोबतच चपळ आणि हुशार बुद्धिमत्तेची गरज असते. यात सिंधुकन्याही कुठे कमी नाहीत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला पैलवान शड्डू ठोकत आहेत. अशाच रणरागिणींची गरज समाजाला असून इतर महिलांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेण आवश्यक आहे.
पैलवानांबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा दिवस सकाळी ४ वाजता सुरु होतो. त्यांना उशिरापर्यंत झोपण्याची परवानगी नसते. सकाळी मैदानावर किंवा आखाड्यावर पोहोचावं लागतं. 10 वाजेपर्यंत त्यांना व्यायाम आणि पैलवानी या सगळ्याचा सराव करावा लागतो. हीच गोष्ट त्यांना संध्याकाळी करावी लागते जी रात्री उशिरापर्यंत चालते. शिस्त त्यांच्या आयुष्याचा पहिला नियम असतो. त्यांचा डाएट शरीराला आतून मजबूत करण्यासाठी बर्यापैकी अवघड असतो. ते अॅब्ज किंवा अॅथलेटीक बॉडी नाही तर पोलादी आणि बलदंड शरीरयष्टीला महत्व देतात. यासाठी बदाम, काजू,अंडे, दूध, तूप, स्प्राऊट्स, सॅलड, केळे, पनीर, पोळ्या, वरण, चणे, चिकन, मटण, सूप यासारख्या गोष्टी पैलवानांच्या डाएटमध्येसुद्धा समाविष्ट असतात. सकाळी उठल्यावर दूध, तूप आणि बदाम किसून त्यात एकत्र करून प्यावे लागते. यातून त्यांना दिवसभर एनर्जी मिळत राहते. त्यांचा हा खुराक सद्यस्थितीत न परवडणारा असल्यानं अनेक पैलवानांना गुणवत्ता दाखवायची संधीच मिळत नाही. एवढंच नाही तर साध्या कुस्तीच्या स्पर्धा देखील जिल्ह्यात होत नसल्यानं पैलवानांना व्यासपीठही नव्हतं.
पण, नुकताच सावंतवाडीत 'मल्लसम्राट केसरी' कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला. यात ओरोस येथील पोलिस पै.आशिष जाधव 'मल्लसम्राट केसरी' ठरला. तर सावंतवाडी येथील मल्ल रोहित जाधव उपविजेता ठरला. मल्लसम्राट प्रतिष्ठान व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने याच आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात 'नवीन पिढी कुस्तीत उतरताना दिसत आहे. पण, त्यांना सुविधा, प्रोत्साहन मिळत नाही. महाराष्ट्र केसरी निर्माण करण्याची ताकद सिंधूभुमीत आहे. परंतु, गरज आहे ती पाठिंब्याची अशी खंत कुस्तीपटू वाय.पी.नाईक यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी देखील तेच म्हणाले, प्रोत्साहन मिळाल नाही अन्यथा आपणही पैलवानकी केली असती. एकुणच, पाहिलं तर सिंधुदुर्गतील पुरुष वा महिला दोन्हींमध्ये रग, जिद्द, इर्षा, मनगटात ताकद सर्वकाही आहे. मात्र, अडचण येतेय ती सुविधा व खर्चिकबाबींची. त्यामुळे जिल्ह्यातील क्रीडा विभाग, सामाजिक संस्था व राजकीय नेत्यांनी हातात हात घालून कुस्तीला बळ दिलं तर निश्चितच एक दिवस 'सिंधु पैलवान' महाराष्ट्र गाजवेल ! त्यासाठी गरज आहे ते पाठीशी उभं राहून फक्त लढ म्हणण्याची...!