उपरकरांनी पुराव्याशिवाय आरोप करणे योग्य नव्हे : प्रभाकर सावंत

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 15, 2024 10:53 AM
views 215  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण राजकोट येथील छ शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर माजी आमदार परशुराम उपरकर सातत्याने प्रसार माध्यमांसमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडत आहेत.आतातर या कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बांधकाम मंत्र्यांची भागीदारी असल्याचा आणि बांधकाम मंत्र्यांचे स्विय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांचे कार्यकारी अभियंता यांच्याशी साटेलोटे असल्याचा बिनबुडाचा आरोप त्यांनी प्रसार माध्यमातून केलेला आहे.एखाद्या घटनेवर, कामावर किंवा विषयावर राजकीय किंवा अन्य हेतूने आरोप करणे हे होतच असते पण त्या आरोपांना सबळ असे पुरावे देणे हे आरोप कर्त्याचे काम असते तरच जनता त्याच्यावर विश्वास ठेवतेअसं सावंत यांनी म्हटलं आहे. 

 रविंद्रजी चव्हाण यांनी आपल्या दोन अडीज वर्षाच्या पालकमंत्री पदाच्या कारकीर्दीत आपल्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून दिला,अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली, पर्यटन वृद्धीच्या अनुषंगाने अनेक कल्पना सत्यात उतरविल्या,असे असताना त्यांच्यावर त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने खोटेनाटे आरोप करण्यामागील नेमका उद्देश अजून जिल्ह्यातील जनतेच्या लक्षात आलेला नाही. खरंतर अनिकेत पटवर्धन हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत,रत्नागिरी जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे आणि निष्कलंकपणे निभावलेली आहे.बांधकाम मंत्र्यांचे सहकारी म्हणून काम करताना त्यांनी कोणताही चुकीचा आर्थिक विषय केला असेल तर उपरकर यांनी तो आम्हाला आणि जनतेसमोर पुराव्यासहित आणावा.खरंतर ते स्विय सहाय्यक पेक्षा मंत्रीमहोदय यांचे सहकारी या नात्याने शासन, प्रशासन आणि पार्टी यामधील दुवा म्हणून काम करतात. कोणतेही पुरावे न देता आमच्या नेत्यांवर, त्यांच्या सहाय्यकावर असे आरोप करणे सुरू राहिल्यास भारतीय जनता पार्टीला याबाबत विचार करावा लागेल.श्री उपरकर यांना आमचे आवाहन वजा विनंती आहे की त्यांनी आजपर्यंत माहितीच्या अधिकारात बांधकाम विभागाकडून भरपूर माहिती गोळा केलेली आहे,त्यातून काही वावगे निष्पन्न होत असेल तर ते जाहीर करून कार्यकारी अभियंता आणि बांधकाम विभागावर वाटेल ती कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे रीतसर तक्रार करावी.काल पत्रकार परिषदेमध्ये बोलल्याप्रमाणे अनिकेत पटवर्धन आणि कार्यकारी अभियंता यांच्या रसायनी येथील कारखाना भेटीची पुराव्यासहित माहिती आणि संभाषण वैगरे जाहीर करावे.कार्यकारी अभियंता यांचे मुंबई दौरे आणि मंत्र्यांचे स्विय सहाय्यक यांचा संबंध पुराव्यानिशी जाहीर करावा. कारण अश्या बिनबुडाच्या आरोपांनी एखाद्या चांगल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करणे ताबडतोब थांबवावे असं प्रभाकर सावंत म्हणाले.

ज्या बांधकाम विभागात रविंद्रजी चव्हाण यांनी कमालीची पारदर्शकता आणली. भरती आणि बदली याविषयात राज्याला एक अनोखा आदर्श घालून दिला.संपूर्ण राज्यात मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता यांची मंडल कार्यालये आणि कार्यकारी अभियंता यांची विभागीय कार्यालये अशी मिळून शेकडो कार्यालये आहेत यापैकी एकाही अधिकाऱ्यांशी मंत्री महोदयांचे लागेबांधे असल्याचा किंवा चुकीच्या अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याचा मंत्री महोदय किंवा त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, स्विय सहाय्यक यांच्यावर दोन वर्षात कुठेही साधा एक आरोप नाही, असे असताना फक्त एका कणकवली विभागीय कार्यालयाच्या कामकाजाबाबत विनाकारण संबंध जोडत बिनबुडाचे आरोप करण्याचा नक्की हेतू काय यांचा उलगडा उपरकरानी करावा असा टोलाही सावंत यांनी लगावला.