कोकणात आंबा बोर्ड निर्माण होणे गरजेचे..!

देवगड येथील चर्चासत्रात बागायतदारांची मागणी | ८० टक्के आंब्याचे उत्पादन कोकणात! नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी व्यवस्थापन महत्वाचे !
Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 23, 2024 14:05 PM
views 122  views

देवगड : राज्यातील एकूण सरासरी आंबा उत्पादनापैकी ८० टक्के आंब्याचे कोकणात उत्पादन होतो. इतर फळांप्रमाणे आंबा बोर्ड निर्माण व्हावे, अशी कोकणातील बागायतदारांची मागणी आहे. याबाबत शासनस्तरावरुन प्रक्रिया सुरू आहे. बोर्डाच्या माध्यमातून आंबा फळाविषयी असलेले प्रश्न सोडविता येतील व अनेक सुविधा उपलब्ध करता येतील. आंबा पिकावरील नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ मैंगो सिटी देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी येथील इंद्रप्रस्थ हॉल देवगड येथे आंबा बागायतदारांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रकाश शिनगारे (संशोधन संचालक) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुरेंद्र पतंगे ( सहयोगी अधिष्ठाता काढणी पश्चात व्यवस्थापन महाविद्यालय रोहा), डॉ. केतन चौधरी (विस्तार शिक्षण विभाग प्रमुख), डॉ. सुरेश नाईक, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रवीण पोकळे, सचिव विजय बांदीवडेकर, नरेश डामरी, तालुका कृषी अधिकारी प्रदीप खाडे आदी

डॉ. शिनगारे यांनी मार्गदर्शन करताना देशामध्ये २७ लाख हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड असून त्यामध्ये कोकणात १ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात आंबा लागवड आहे. राज्यातील आंबा लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र कोकणात आंबा लागवडीसाठी व्यापले आहे. मागील काही वर्षात आंबा उत्पादनावर खूप परिणाम झाला आहे. याला एकमेव कारण म्हणजे बदलते हवामान आहे. मोठ्याप्रमाणात तापमान वाढले आहे. पाऊस पडण्याचा हंगाम बदलला आहे. आता वर्षभर पाऊस पडत आहे. थंडीच्या प्रमाणात चढ- उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे आंबा हंगाम लांबणीवर जात आहे. त्यातच आंबा पिकावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त होत आहे. फळमाशीचा प्रादुर्भाव मागील काही वर्षापासून खूपच झाला आहे. फळमाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्षक सापळे उपलब्ध आहेत. या सापळ्यात माशीला आकर्षित करण्यासाठी जे औषध आहे ते बागायतदारांनी दर्जेदार घेतले पाहिजे. सर्व बागायतदारांनी दर्जेदार औषध सापळ्यात ठेवले तर फळमाशीवर नियंत्रण करणे सहज शक्य होणार आहे.

थ्रीप्सवर नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशकांचा अति वापर झाल्यामुळे श्रीप्सच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे श्रीप्समध्ये वाढ होताना दिसत आहे. विद्यापीठामध्ये यावर संशोधन सुरु आहे. आंबा उत्पादन जास्तीत-जास्त होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यातून आंबा उत्पादन चांगले होईल, असे सांगितले. डॉ. के. व्ही. मालशे यांनी आंबा लागवड तंत्रज्ञान आणि पुनर्जीवन या विषयावर मार्गदर्शन करताना कोकणातील आंबा उत्पादन हे एकाच जातीचे घेतले जात आहेत.

यामुळे काही प्रमाणात उत्पादनात परिणाम होत आहे. परागिकरणाची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हापूसबरोबरच इतर जातीच्या आंबा झाडांची लागवड केली पाहिजे. कोकणात आंबा उत्पादकता सुमारे अडीच ते तीन टक्के हेक्टरी अशी आहे. राज्यात आंब्याचे उत्पादन ५ टन हेक्टर एवढे आहे. हापूसचे एकाच जातीचे उत्पादन जास्त होते. अन्य जातीचे फळ उत्पादन झाले पाहिजे असे सांगितले.

डॉ. ए. वाय. मुंज (उद्यान विद्यावेता) यांनी आंबा कीड व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रादुर्भाव ठरत असलेल्या कीटकांची माहिती दिली. तसेच त्या कीटकांवर उपाययोजना करण्यासाठी कीटकनाशक वापराबाबत माहिती दिली. आतापर्यंत आंबा पिकावथ १८५ किडीची नोंद झाली आहे. फार पूर्वीपासून कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे. आता त्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. ब्रीप्सवर औषध उपलब्ध नाही. त्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. तुडतुडे, थ्रीप्स, फळमाशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मान्यता प्राप्त औषधांची फवारणी नियमानुसार झाली पाहिजे. वेगवेगळी औषधे मिश्रण करून त्याची फवारणी होत असेल तर आपणच कीटकांच्या वाढीसाठी जबाबदार ठरत आहोत. विद्यापीठांनी प्रमाणित केलेल्या औषधांची फवारणी वेळापत्रकानुसार झाली पाहिजे. अति औषध फवारणी पिकासाठी परिणामकारक होत आहे, असे सांगितले. डॉ. एस. बी. स्वामी यांनी आंबा काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. आहेत. प्रास्ताविक डॉ. केतन चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन मनस्वी घारे यांनी केले.