
बांदा : मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथे सुरू असलेल्या उड्डाणपूलाचे काम बेकायदा सुरु असून गोव्याच्या दिशेने जाणारा सेवा रस्ता कमी रुंदीचा असल्याचे सांगत बांदा ग्रामस्थ आज आक्रमक झालेत. उड्डाणंपुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बांदा शहराचे विस्तारीकरण पाहता तसेच महामार्गावरून बांदा शहरात, दाणोली मार्गावर व दोडामार्गच्या दिशेने होणारी वाहतूक त्याच सेवा रस्त्यावर उतरणार असून केवळ सहाच मीटर रुंदीचा रस्ता ठेवल्याने केवळ एकच गाडी सुटते. समोरून दुचाकी जरी आली तर वाहतूक कोंडी होणार त्यामुळे ज्या प्रकारे नऊ मीटरचा सेवा रस्ता प्रस्तावित आहे त्याच प्रकारे करा. कोणा एकाच्या हितासाठी तुम्ही सर्व बांदा वासीयांचे आणि वाहनधारकांचे का नुकसान करता असा सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत तुम्ही उड्डाणपूल व महामार्गाच्या जागेचा सर्व्हे करत नाही. तुम्ही ग्रामस्थांना एका बाजूचा सर्व्हिस रोड कोणाच्या आदेशाने कमी केला ह्याचे स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवा अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी उपस्थित महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, अजय महाजन, निखिल मयेकर, हेमंत दाभोलकर, पांडुरंग नाटेकर, अक्षय बांदेकर, संदेश पावसकर, सुनील नाटेकर, संतोष खानोलकर, राकेश वाळके आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. बांदा येथे कट्टा कॉर्नर ते स्मशानभूमीपर्यत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुरुवातीपासूनच बसस्थानक समोर असलेल्या हद्दीवरून ग्रामस्थ व महामार्ग विभाग यांच्यात वाद झालेत. सध्यस्थीतीत उड्डाणपुलाच्या गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. बांदा ग्रामस्थांनी आज येथे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी भेट देत सर्व्हिस रोडबाबत जाब विचारला. यावेळी महामार्गविभागाचे निवासी अभियंता अनिल सराफ आणि दिलीप पाटण उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी येथील कामात तुम्ही व ठेकेदार मनाला हव तस बदल करता का सवाल केला. तुम्हाला शासनाने दिलेल्या प्लॅन नुसार काम करता येत नाही का असा सवाल केला. यावेळी उपस्थित अधिकारी सराफ यांनी आम्ही आम्हाला दिलेल्या प्लॅन नुसारच काम करतो असे सांगितले. यावर जर तुम्हाला प्लॅन दिला आहे तर तुम्ही सगळीकडे ४५ मिटर रुंदी घेतली व केवळ एकीकडे का ४१ मीटर घेतली असा सवाल केला यावर समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. तुम्हाला जर समर्पक उत्तरे देता येत नसतील तर तुमच्या वरिष्ठांना बोलवा असे खडे बोल काणेकर यांनी सुनावले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ हेमंत दाभोलकर यांनी तुमच्याकडे असलेला रस्त्याचा नकाशा आणि प्लॅन दाखवा असे सांगितले यावेळी उपस्थित अभियंता पाटण यांनी प्लॅन दाखवला तो प्लॅन ९१ सालचा होता आणि सध्या काम सुरू आहे ते ९९ साल च्या प्लॅन प्रमाणे. यावेळी ग्रामस्थ आक्रमक होत तुम्ही आम्हांला प्लॅन दाखवू शकत नाही आमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही त्यामुळे आम्हांला समर्पक उत्तर आणि प्लॅन दाखवेपर्यत काम बंद करा तसेच जसा सर्व्हिस रोड एकाबाजूने 9 मीटर ठेवण्यात आला आहे तसाच दोन्ही बाजूने करावा अन्यथा आम्ही ग्रामस्थ काम करायला देणार नाही असा सज्जड इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.