POP गणेशमुर्तींना परवानगी योग्य की अयोग्य ?

Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 19:10 PM
views 685  views

सावंतवाडी : यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला बंदी नाही. मात्र, या मुर्तींच विसर्जन कृत्रिम तलावातच करावं असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत केलं. यासाठी कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशास- नामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पर्यावरण पुरक मुर्तीसह मुर्तींच पावित्र्य राखलं जाण्या विषयीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भातील मुर्तीकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. 

विधानपरिषदेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालू नये. यामुळे मूर्ती तयार करणाऱ्या कारागीरांच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना आर्थिक फटका बसेल. या उत्सवाच्या माध्यमातून राज्यात ७० ते ८० हजार कोटींची उलाढाल होते. त्यावरही परिणाम होईल अशी भीती शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मांडली होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्याचे दिल्ली प्रदूषण महामंडळाने स्पष्ट केले आहे. गुजरात आणि हैदराबाद मध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जातात. असे असताना राज्य सरकारने अशा मूर्तीवर बंदी घालणे अन्यायकारक आहे. उलट कागदाच्या मूर्तीचा सरकारने सुचविलेला पर्याय अधिक प्रदूषणकारक असल्याचा मुद्दा पाटील यांनी मांडला. त्यावर उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना यंदा बंदी घातली नसल्याचे सांगितले. दोन ते चार फूट मूर्तीला परवानगी दिली आहे. मात्र, यापुढे पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणे थांबले पाहीजे. कागदाच्याच मूर्ती बनवा हेही बंधनकारक नाही. परंतु, भविष्याचा विचार करून मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती चिकट कशी तयार करता येईल, याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर कृत्रिम तलाव करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत असं ते म्हणाले. 

प्रतिक्रिया

मातीच्या मूर्ती करणाऱ्या गणेशमूर्तीकारांच्या भावना दुखावल्या गेल्यात. POP मूर्ती बंदी संदर्भात अनेकवेळा आम्ही भेटलो निवेदन दिली. पण, आश्वासना पलीकडे काहीच मिळालं नाही. त्याचं उत्तर आज मिळालं.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यादृष्टीने गणपती विसर्जनानंतर अनेक महिने नदी, नाले, तलाव समुद्राकिनोर येथे जे आमच्या दैवताचं विदारक स्वरुप दिसतं. त्यामुळे ज्या वेदना होतात त्या पहाव्यात. आपण धार्मिक आहात. पृथ्वीमाता आई म्हणजे मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मानव वर्षातून तीन वेळा तिची पूजा करत असतो.  जर POP ला प्रोत्साहन दिलंत तर पारंपरिक मुर्तीकारांच भवितव्य काय ? ते मूर्तीकार स्वतः मूर्ती करू शकत नाहीत. त्यामुळे मातीच्या मूर्त्या तयार करणारे पिढ्यानपिढ्या ज्याचा व्यवसाय आहे त्याच्या तोंडातला घास काढून घेतला जात आहे.असच चाललं तर थोड्याच दिवसात सिंधुदुर्गातील मूर्तिकला नष्ट होणार आहे.

: नारायण सावंत, अध्यक्ष, श्री गणेश मूर्तीकार संघ, सिंधुदुर्ग


राजकीय विधान हे अर्थशास्त्रांशी संबंधित असतं, त्यामध्ये पर्यावरण हा भाग नसतो. पेणमध्ये अडीच लाख लोक या मुर्तींच्या इंडस्ट्रीत असून अकराशे कोटींचा टर्नओव्हर आहे. त्यामुळे कोणतही सरकार POP बंदी करणार नाही. हा प्रकार देशी दारूचं दुकान विरूद्ध अमृत विकणारी कंपनी असा आहे. POP पर्यावरणाला धोका देतो म्हणूनच कृत्रिम तलावाचा मुद्दा समोर आला आहे. मग, पर्यावरणाचा नाष होत नाही ? हे कशाचा आधारावर आपण म्हणू शकतो. हे असं झालं दारू प्या, पण घरी जाऊन पीऊ नका, बारमध्ये जाऊन प्या. पण, शेवटी दारूचा परिणाम लिव्हरवर होणारच त्यामुळे आज ना उद्या सरकारला POP चा गांभीर्याने विचार करावाच लागेल. गाईचं शेण आणि माती हा पर्याय योग्य आहे का ? यावर संशोधन झालं पाहिजे. त्यावर रिसर्च कमिटी नेमली पाहिजे. आपदधर्म म्हणून मंत्र्यांच विधान योग्य आहे. पण, तो स्वभाव धर्म होता नये. पर्यावरणपुरक विचार करावाच लागेल. नाहीतर निसर्ग तुम्हाला माफ नाही करणार, सुप्रीम कोर्ट, ग्रीन क्रिमिनल नंतर निसर्ग नावाचं कोर्ट लागत हे ध्यानात ठेवावं. मृतदेह जाळल्यावर तो पूर्णपणे जळला की नाही याची आपण खात्री करतो. मानवाची आपण एवढी काळजी घेतो मग, ज्याला देव मानतो तो पूर्णपणे विघटीत झाला की नाही ? हे कोकणी माणूस १० वेळा बघतो. सरकारची ही भूमिका दीर्घकालीन योग्य नाही. पर्याय शोधावा लागेल, गोमय गणेश हा त्याला योग्य पर्याय आहे.

: डॉ. प्रसाद देवधर, अध्यक्ष, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान

प्लॅस्टर ऑफ पॅरिस बदलत्या काळाची गरज आहे. कोकणात प्रदूषण प्ल विषय मोठा नाही, त्यामुळे ही आज बाप्पाच्या मोठ्या मुल्यांची, घरोघरी बाप्पाचे पूजन होते. त्यामुळे कारागिरांची कमतरता व वाढती मागणी त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या सुबक व कमी श्रमात मूर्ती बनते. त्यामुळे हा निर्णय सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय गणेश हा मूर्तिकार व भक्तांना दिलासा देणारा आहे.

 पंढरीनाथ देऊलकर, गणेश मूर्तिकार, गणेश आर्ट साटेली -भेडशी

क्रुत्रिम तलावाची सोय आपल्या वाड्यावाड्यात केव्हा करणार हे मंत्री केसरकर कधी कळवतील ?  बंधी उठवताना आपल्या आराघ्य श्री गणशाची नदी, नाले, तळी मद्धे विसर्जन झाल्यावर मुर्ती विटंबना थांबवण्यासाठी विधान भवनात आवाज उठवावा

: दीपक जोशी, मुर्तीकार

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटना सोबतच कलाकारांचा जिल्हा आहे, यात गणेश चतुर्थी हा कोकणातील एक महत्वाचा सण आहे त्यामुळे मातीच्या सुबक मुर्त्या बनवण्याची प्रथा  POP मुळे कुठेतरी लोप पावताना दिसत आहे, यामुळे व्यवसाय नक्की वाढेल पण वृढिपरंपरा आणि नवनवीन मुर्ती कलाकार निर्माण होणे या वर्षोनुवर्ष चालू असलेल्या परंपरा निर्णयामुळे येणार्या काळात लोप पावतील 

: सागर नाणोसकर, एक गणेश भक्त

Pop  मूर्ति हा विषय फक्त मूर्ति विसर्जन आणि प्रदुषणा पुरता मर्यादित नाही. pop मूर्तिंच्या   आयातीमुळे इथला स्थानिक कलाकार आणि त्याची कला नामशेष होत चालली आहे. त्याचा विचार कोण करणार ? मूर्ती कशी घडते हा वारसा पुढील पिढीला कुठुन मिळणार

: विलास मळगावकर, मुर्तीकार



पर्यावरणपूरक गणेश मूर्ती !

▪️ पर्यावरणपूरक मूर्तीत माती,गोमय (देशी गायीचे शेण),गोंद यापासून तयार केलेल्या न रंगवलेल्या मूर्ती किंवा गेरू, हळद, नैसर्गिक कुंकू यांनी रंगवलेल्या मूर्तीसह नैसर्गिक रंग वापरणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम रासायनिक रंग हे विषारी आणि अविघटनशील असल्यामुळे असे रंग पाण्यातील जीवसृष्टीस व मानवी आरोग्यास घातक ठरतात. मातीच्या विघटनशील मूर्ती कोठेही विसर्जित केल्या तरी पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. अगदी हौद किंवा बादलीत जरी ह्या मूर्ती विसर्जित केल्या आणि मूर्ती विरघळल्यावर ते पाणी झाडांना किंवा नुसत्या जमिनीत घातले तर ते पाणी झाडे व जमिनीकरिता हितकारकच ठरते.

 

▪️ नुसत्या सुपारीचा गणपतीदेखील पर्यावरणपूरक म्हणता येईल. तसेच सुपारीवर कारागिरी करून त्यास मूर्तीचे स्वरूप पण देता येते. ज्यांची फक्त सुपारीवर प्राणप्रतिष्ठा करून सुपारीचा गणपती बसवण्याची तयारी असेल ते असा गणपती पर्यावरणपूरक म्हणून बसवू शकतात. परंतु मूर्तीकरिता सुपारीचा भरपूर प्रमाणात वापर होतो हे लक्षात घेता हा पर्याय शंभर टक्के योग्य म्हणता येणार नाही.

 

▪️शाडूची मूर्ती पाण्यात विरघळत असल्यामुळे त्यास पर्यावरणपूरक मानले जाते. पण शाडू ही चिकणमाती असून वरकरणी विरघळणारी वाटली तरी तिचा राब पाणवठ्याच्या तळाशी साचून राहतो. त्याचा विपरीत परिणाम त्या पाणवठ्याच्या तळाशी असलेल्या अखंड जिवंत झऱ्यांवर होत असतो. शिवाय शाडू माती ही गुजरातसारख्या ठिकाणांहून डोंगरावरून आणली जाते व त्याकरिता डोंगर उकरावे लागतात. ही बाब लक्षात घेतल्यास शाडूची मूर्ती देखील पर्यावरण समतोल राखण्यासाठी उपयोगी नाही.

 

▪️ कागद तयार करण्यासाठी झाडे तोडली जातात. त्यामुळे कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती विघटनशील असल्या तरीदेखील त्या पर्यावरणपूरक नाहीत.

 

▪️घरात कायम स्वरूपी धातूची मूर्ती ठेवणे व तिचा दरवर्षी गणपती उत्सवात वापर करणे ही पद्धत हितकारक आहे. आवश्यक वाटल्यास विसर्जनाची म्हणून माती किंवा सुपारीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून वापरता येते.


एकंदरीत,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदी उठवल्यानं निश्चितच त्याचा फटका मातीच्या मुर्त्या बनवणाऱ्या पारंपरिक मुर्तीकारांवर होण्याची शक्यता आहे. POP च्या मुर्ती वजनाला हलक्या असल्यानं त्याकडे अधिक ओढा असेल. प्रत्येक मुर्तींच विसर्जन कृत्रिम तलावातच होईल याची शाश्वती देता येत नाही. कृत्रिम तलावात मुर्तींच पावित्र्य देखील राखलं जाणार नाही. त्यामुळे पीओपी बाप्पा योग्य की मातीचा व गोमय  'पर्यावरणपूरक' बाप्पा योग्य ? हे आता गणेशभक्तांनाच ठरवावं लागेल.