
सिंधुदुर्ग : कर्नाटकातील वरिष्ठ IPS अधिकारी हेमंत एम. निंबाळकर यांची माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या शासकीय आदेशानुसार श्री. निंबाळकर यांना देण्यात आलेली अभ्यास रजा तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली. श्रीमती विनोद प्रिया या वरिष्ठ IAS अधिकारी ज्यांचा समवर्ती पदभार होता त्यांना मुक्त करण्यात आला आहे.
हेमंत निंबाळकर हे 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी बेळगावचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे.त्यांनी मे 2007 मध्ये बेळगाव आणि गोवा दरम्यान एका मोठ्या अमली पदार्थाच्या व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यामध्ये गोव्यातील एकासह चार जणांना अटक करण्यात आली होती.
आयपीएस (वेतन) नियम 2016 च्या नियम 12 अंतर्गत अनुसूची 11 मध्ये समाविष्ट केल्यानुसार आयुक्त, माहिती आणि जनसंपर्क विभाग, बेंगळुरू हे पद हे पोलीस महानिरीक्षक, दक्षिणी परिक्षेत्र, म्हैसूर यांच्या संवर्ग पदाच्या समतुल्य दर्जाचे आणि जबाबदाऱ्या म्हणून घोषित करण्यात आले आहे. श्री. निंबाळकर यांचा जनसंपर्क दांडगा असून कर्नाटक आणि गोवा यांच्यातील संबंधांना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.