सावंतवाडीत ३१ जानेवारीला निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2026 20:37 PM
views 54  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील नामवंत कवी आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ गेली ४३ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या आरती मासिक व चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था सावंतवाडी दरवर्षी श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या सहकार्याने १९ वे निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन ३१ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. संमेलन आयोजनाची जबाबदारी 'आरती'च्या कार्यकारी संपादक ज्येष्ठ साहित्यिक उषा परब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला समिती गठीत करून त्या समितीवर सोपविण्यात आली आहे.

संमेलनासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील प्रथितयश कवयित्री तसेच सिंधुदुर्ग व सावंतवाडीतील निवडक  कवयित्रींना आमंत्रित केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पल्लवी बनसोडे या शब्दवेल प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन गोव्यातील कवयित्री, पत्रकार, नाट्यकर्मी कालिका बापट यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय डॉ. चित्रा गोस्वामी(रत्नागिरी), डॉ. लता ऐवळे कदम (सांगली), पुजा दिवाण (कोल्हापूर), श्रृती हजारे ( गोवा) या प्रथितयश कवयित्रींचा समावेश आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आरती मासिक स्त्रियांसाठी एक व्यासपीठ देत आहे. दरम्यान, नव्या लिहीत्या हातांचा शोध घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या संमेलनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग गोवा मर्यादित नवोदित कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांनी २० जानेवारीपर्यंत आपल्या दोन कविता उषा परब, स्नेहांकुर, सर्वोदय नगर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी मो. ९४२३८१८८२८ येथे संपर्क साधावा. दरवर्षीप्रमाणे हे १९ वे संमेलन असंख्य काव्यप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न होईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, संपादक प्रभाकर भागवत, सहसंपादक भरत गावडे, विठ्ठल कदम, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.