
सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानकात इलेक्ट्रिक एसटी बससाठी चार्जिंग सेंटर उभारण्यासाठी कोलगाव वीज उपकेंद्र ते बसस्थानक या मार्गावर केबल टाकली जात आहे. कोलगाव बाहेरचावडा परिसरात रस्ता खणून खडी व माती रस्त्यावरच टाकली गेली आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून आज सकाळी तशा दोन घटनाही घडल्या आहे.जुना मुंबई-गोवा महामार्ग व शाळा जवळ असल्याने मोठा अपघात होण्यापुर्वीच सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभागाने यांची नोंद घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तर जोपर्यंत आणलेला रस्ता सुस्थितीत केला जात नाही तोवर पुढच खोदकाम करू देणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिलाय.
खोदाईमुळे व रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यात घडी व माती रस्त्यावर आल्याने अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. सकाळपासून अशा दोन घटना देखील या परिसरात घडल्या आहेत. नागरीकांसह वाहन चालकांना यामुळे अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. जवळच शाळा असून हे रहदारीच ठिकाण आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम व परिवहन विभागाने यांची नोंद घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.
एसटी महामंडळाकडून सावंतवाडी आगारासाठी इलेक्ट्रिक एसटी बसेस लवकरच मिळणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाकडून सावंतवाडी आगाराच्या आवारात इलेक्ट्रिक एस. टी. बस चार्जिंग सेंटर उभारण्यात येत आहे. या सेंटरसाठी लागणारा ११ केव्हीचा इलेक्ट्रिक सप्लाय वीज वितरण कंपनीच्या कोलगाव येथील उप केंद्रातून घेण्यात येत आहे. यासाठी उपकेंद्र ते बसस्थानक पर्यंतच्या मार्गावरून रस्त्याच्या एका बाजूने रस्ता खोदाई करून ही केबल टाकण्यात येत आहे. दरम्यान, कोलगाव बाहेरचावाडा येथील हा रस्ता पुर्ववत व वाहतूकीसाठी सुरक्षित होत नाही तोवर पुढील खोदकाम करू देणार नाही असा इशारा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी दिला आहे.