दोडामार्ग : तिलारी उजवा कालवा प्रकल्पाची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन कोसळली आहे. या कामाची चौकशी होऊन ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी कोसळलेल्या पाईपलाईनजवळच शेतकऱ्यांसमवेत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा घोटगे सरपंच भक्ती दळवी यांनी निवेदनाद्वारे तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, घोटगेवाडी, परमे, घोटगे तिलारी उजवा कालव्याची पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. गेल्या दहा महिन्यापूर्वी हीच पाईपलाईन कोसळली होती. तेथे ताबडतोब नवीन पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. परंतु वर्षाच्या आत तीच पुनरावृत्ती होऊन पुन्हा पाईपलाईन कोसळली आहे. तिलारी उजवा कालवा सिंचन क्षेत्राखाली घोटगे, परमे गावातील शेकडो एकर जमीन लागवडीखाली आहे. यात केळी, माड, पोफळी व इतर पिकांची लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांनी केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. या पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता असते. मात्र उजवा कालवा पाईपलाईन कोसळल्यामुळे परमे, घोटगे गावातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी या विभागाचे उपअभियंता म्हेत्रे व श्री तुंबेकर जबाबदार आहेत. पाईपलाईनच्या केलेल्या कामाची चौकशी व्हावी. तसेच कोसळलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करावी. अन्यथा प्रजासत्ताक दिनी कोसळलेल्या पाईपलाईन ठिकाणी घोटगे, परमे गावातील शेतकऱ्यांसमवेत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा घोटगे सरपंच भक्ती दळवी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी विठ्ठल दळवी, भरत दळवी उपसरपंच श्री विजय दळवी सतीश दळवी श्रीअरुण दळवी, देऊ दळवी, सतीश परब, यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या यावेळी तहसीलदार यांनी तिलारी कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दहा दिवसात उजवा कालव्यातील फुटलेले पाईप लाईन पूर्ण दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.