
वैभववाडी : करूळ येथे झालेल्या घरफोडीचा तपास कसून करण्यात यावा व चोरट्यांना जेरबंद करा या मागणीचे निवेदन करूळ सरपंच नरेंद्र कोलते व ग्रामस्थांनी वैभववाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांना दिले आहे.
1 जूनच्या रात्री करूळ जामदारवाडी येथील अशोक गणपत सरफरे यांचे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडले. मुख्य दरवाजाला असलेले कुलूप तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व बेडखाली असलेल्या चावीने तिजोरी उघडली. चोरट्यांनी तिजोरीतील तब्बल पंधरा तोळे सोन्याचे दागिणे लांबविले. सरफरे यांचा आठ लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.स्थानिक पोलीस व एलसीबी कडून चोरीचा तपास सुरू आहे. परंतु अद्याप कोणतेही धागेदर हाती लागलेले नाहीत. या घटनेची कसून चौकशी करून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रकाश सावंत, अशोक सरफरे, रवींद्र सरफरे, संदीप सरफरे, मंगेश शिवगण, उदय सावंत आदी उपस्थित होते.