
दोडामार्ग : आपण येथील जनतेच्या विश्वासावर कुटे कमी पडलो याचे समीकरण करून इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आता जोमाने कामाला लागा. शिवाय येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपल्याला जिंकायचं आहे असा उत्साह माजी खासदार विनायक राऊत यांनी इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये भरला. माजी खासदार विनायक राऊत दोडामार्ग तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी राऊत बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना घारे परब, उबाठा जिल्हाध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाध्यक्ष जानवी सावंत, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, तालुकाप्रमुख संजय गवस , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक, गितेश राऊत, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाठ, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, माजी जि. प. सदस्य संपदा देसाई, जिल्हा सरचिणीस प्रा. संदीप गवस, आबा सावंत, नगरसेवक चंदन गावकर, मदन राणे, मिलिंद नाईक, संदेश राणे आदी उपस्थित होते.
यावेळी राऊत बोलताना म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात मते कमी का पडली असे कार्यकर्त्यांना विचारले असता धनशक्ती चे कारण देतात. पण या धनशक्तीचा वापर रत्नागिरी जिल्ह्यात पण झाला आहेच ना मग तिथे पण मते कमी पडायला हवी होती. पण रत्नागिरीत तसे झाले नाही त्यामुळे आपण कुठे तरी कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यास कमी पडतोय असे व्हायला नको आपल्या या पुढे सर्व निवडणुका जोमाने जिंकायच्या आहेत.
जनसंपर्क वाढावा : राऊत
दोडामार्ग तालुक्यातूनही कमी मते मिळाली याचा विचार करता आपण कुटे कमी पडलो याचा विचार व्हायला हवा. शिवाय येथील जनतेला भेटा त्यांच्या गाठीभेटी घ्या आमच काय चुकलं हे त्यांना विचारा. त्यांनी सांगितलेल्या चुका परत होणार नाही याची काळजी घ्या. लोकांची कामे करा. त्यांना नाव नवीन योजना कशी मिळवून देता येतील याकडेही गांभीर्याने बघा. इंडिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करा व येथील जनतेचे प्रश्न सोडवा असेही उपस्थितांना सांगितले.
लोकसभा निवडणुकीत हरलो म्हणून सगळ्याच निवडणुकीत आपण हरणार अशी जर मानसिकता असेल तर ती बदला. येणाऱ्या सर्व निवडणुका ही अत्यंत महत्वाच्या आहेत. झालेल्या चुका सुधारून लोकांचे गाऱ्हाणे ऐकून त्याप्रमाणे कामे करा. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपलाच विजय होईल अशी मानसिकता ठेऊन पुढील कामाला लागा असेही आवाहन खासदार राऊत यांनी यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना केले.