इन्स्टाग्रामवरची ओळख अन दिल्ली ते वेंगुर्ला प्रवास

Edited by: दिपेश परब
Published on: July 01, 2023 18:48 PM
views 919  views

वेंगुर्ला : सध्या सोशल मिडियाचा एवढा भयानक परिणाम जाणवत आहे की आता अल्पवयीन मुलांचे पालक हैराण झाले आहेत. असाच प्रकार नुकताच वेंगुर्ल्यात घडला. दिल्ली येथील एका अल्पवयीन मुलीने इन्स्टाग्रामवर वेंगुर्ला येथील मुलाशी मैत्री केली अन तिने थेट वेंगुर्ला गाठलं.

दिल्ली जहांगीरपुरी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरात कोणालाही न सांगता तिचा इंस्टाग्राम वरील मित्र वेंगुर्ला पिराचा दर्गा येथे राहणारा जावेद मकानदार (वय ३६) याचेकडे राहण्यासाठी आली. दरम्यान याबाबत माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावरून ती दिल्ली येथून घरातून निघून आल्याबाबत समजले. नॉर्थ वेस्ट दिल्ली जहांगीरपुरी पोलीस स्टेशन मध्ये याबाबत तिच्या कुटुंबियांनी ती नापता झाल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत दिल्ली पोलीस तपास करीत असल्याचे वेंगुर्ला पोलिसांना तापसाअंती समजून आले. त्यामुळे सदर अल्पवयीन मुलीची शुक्रवारी ३० जून रोजी वैदयकिय तपासणी करुन तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अंकुर केंद्र सावंतवाडी येथे वेंगुर्ला पोलिसांनी दाखल केले होते. 

दरम्यान याबाबत दिल्ली पोलिसांशी संपर्क केल्यानुसार आज शनिवारी (१ जुलै) दिल्ली पोलीस वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आल्याने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने दिल्ली पोलिसानी या गुन्ह्यातील आरोपी जावेद ताजुददीन मकानदार याला ताब्यात घेतलेले आहे. तसेच अंकुर येथे जमा केलेल्या अल्पवयीन मुलीस वेंगुर्ला पोलिसानी दिल्ली पोलिसाना ताब्यात दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली आहे.