
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात शुक्रवारी रात्री उशीरा एक युवती बेवारस स्थितीत फिरताना सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना आढळून आली. दोडामार्ग येथील मूळ असणारी ही युवती निराधार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सावंतवाडी पोलिसांच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून तीला पिंगुळी येथील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या जिव्हाळा सेवाश्रम येथे आश्रय देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ऐश्वर्या आनंद बांदेकर (वय - २० वर्षे रा. कुंब्रल ता. दोडामार्ग )ही बेवारस स्थितीत फिरताना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्ता रूपा मुद्राळे यांना दिसून आली. त्यांनी तीला सावंतवाडी पोलीस ठाणे येथे घेऊन जात चौकशी केली. तिथे तीला अत्यवस्थ वाटत असल्यानं उपजिल्हा रुग्णालयात आणून तिच्यावर उपचार केले गेले. तिच्या डोक्याला जखमा असून गोवा बांबोळी येथे उपचार सुरू असल्याचे यावेळी लक्षात आले. तसेच ती तणावाखाली असून अस्वस्थ असल्याचे जाणवले. उपचारानंतर सुरक्षीततेच्या दृष्टीने तिला सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवले होते. यानंतर पोलिसांनी तिचा नातेवाईकांचा शोध होईपर्यंत आधार तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने जिव्हाळा सेवाश्रम येथे ठेवण्याची विनंती बिर्जे ट्रस्टला केली. त्यानुसार तीला सेवाश्रमात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिस हवालदार श्री. मातोंडकर, सामाजिक बांधिलकीचे रुपा मुद्राळे, रवी जाधव, हेलन निब्रे, लक्ष्मण कदम आदी उपस्थित होते.