
सिंधुदुर्गनगरी : वाचन, चळवळी, आंदोलने, लोकसंपर्क, मानसोपचार यातून जेव्हा मला काही वेगळे जाणवते, नवीन कळते, ते मला लोकांना सांगावेसे वाटते. या भावनेतूनच मी लेखनाकडे वळलो. मात्र २८ पुस्तके प्रकाशित झाली असली तरी मी स्वत:ला लेखक, साहित्यिक समजत नाही. माझा मूळ पिंड कार्यकर्त्याचाच आहे, असे मनोगत सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग'प्रणित 'आम्ही साहित्यप्रेमी'च्या चौथ्या मासिक कार्यक्रमात 'लेखकाशी भेट' याअंतर्गत डॉ. रुपेश पाटकर यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी ते बोलत होते. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात सतीश लळीत आणि डॉ. सई लळीत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या कार्यक्रमात विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांनी आपला जीवनपट उलगडून दाखवला. आडाळी (दोडामार्ग)चे सरपंच व पत्रकार पराग गावकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ज्येष्ठ कवयित्री श्रीमती संध्या तांबे यांच्याहस्ते डॉ. पाटकर यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.
बांदा येथील डॉ. पाटकर हे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ असून त्यांचे सामाजिक कार्य लक्षणीय आहे. मानवी तस्करी, कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य, कार्यशाळांचे आयोजन, कामगार चळवळ, गोव्यातील कातकरी वस्तीत काम, पर्यावरण संरक्षण लढ्यात सहभाग यासह अनेक क्षेत्रात त्यांचे काम आहे. हे सर्व करीत असताना ते सातत्याने लेखन करतात. आतापर्यंत त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठेचा समाजकार्य कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार त्यांना अलिकडेच प्राप्त झाला आहे.
आपले बालपण बांद्यासारख्या छोट्याशा गावामध्ये गेले. शालेय जीवनात मी सर्वसाधारण विद्यार्थी होतो. मात्र वडिलांनी लोकांच्या उपयोगी पडावेस, यासाठी तुला डॉक्टर व्हायचे आहे, असे माझ्या मनावर बिंबवले, असे सांगून डॉ. पाटकर म्हणाले की, यातूनच मी वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन एमबीबीएस झालो. त्यानंतर सावंतवाडीतील कुटिर रुग्णालयात इंटर्नशिप करीत असताना एका रुग्णाबाबत आलेल्या अनुभवामुळे मी मानसोपचाराकडे वळलो आणि मानसोपचारातील पदव्युत्तर पदविका मिळवली. वडिलांच्या आग्रहामुळे मी डॉक्टर झालो तरी माझे मन त्यात रमत नव्हते. कारण मला प्राध्यापक व्हायचे होते.
पुढे मी आंदोलनांकडे वळलो. पाईपलाईनविरोधी काम करीत असताना काही गोष्टी लोकांना समजावून सांगण्याची गरज वाटली. त्यामुळे पत्रके, लेख अशा लेखनाकडे वळलो, असे सांगून ते म्हणाले की, कळणे खाणविरोधी आंदोलन, गोव्यातील कामगार चळवळीत पाच वर्षे पूर्णवेळ केलेले काम, कातकरी वस्तीत केलेले काम, गोव्यात एका दैनिकात केलेली पत्रकारिता यामुळे वेगवेगळे अनुभव येत गेले. यातूनच माझ्यातील कार्यकर्ता आणि त्याचबरोबर लेखक घडत गेला. मात्र सकस लिहायचे असेल तर भरपूर वाचन करावे लागते, हे लिहू इच्छिणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
सुजाण पालकत्वाबाबत डॉ. पाटकर म्हणाले की, पालकांनी 'नाही' म्हणायला शिकले पाहिजे आणि आपल्या मुलांशी संवाद वाढविला पाहिजे. अपत्याचा छोटामोठा प्रत्येक हट्ट तात्काळ पुरविण्याकडे अलिकडच्या पालकांचा कल असतो. मात्र कोणतीही गोष्ट सहजसाध्य नसते, हे त्यांना समजण्यासाठी आपण किती कष्ट घेतो, हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे. कष्टाचे महत्व आणि श्रमप्रतिष्ठा ही लहान वयातच समजावून देणे गरजेचे असते. पालक पाल्य संबंध हा विषय अत्यंत दुर्लक्षित झाला आहे. मागितलेली प्रत्येक वस्तु ताबडतोब पुरवण्यापेक्षा पालकांनी आपल्या मुलांशी भावनिक नातेसंबंध निर्माण केले पाहिजेत. या सर्व बाबींना प्राधान्य दिले पाहिजे.
डॉ. पाटकर हे गोव्यातील 'अर्ज' (अन्याय रहीत जिंदगी) या शरीरविक्रय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या संस्थेसोबत काम करतात. या व्यवसायातील महिलांचे होणारे शोषण, त्यांच्या सुटकेसाठी केले जाणारे प्रयत्न, पुनवर्सन याबाबतची माहिती दिली. यावेळी श्रोत्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. पुरुषोत्तम लाडू कदम यांनी आभार मानले.