
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवून ही जागा अनधिकृत बांधकाम केलेल्या व्यक्तीला देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घाट घातला असून ही जागा अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला कशी मिळेल त्यासाठी शासकीयस्तरावर अहवाल तयार करण्यात आले आहेत. आपल्या अधिकारांचा गैरवापर करून शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला जागा देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ शहरातील सर्वे नंबर ३३८/० हा महाराष्ट्र शासनाच्या नावे सातबारा असून या जमिनीची मोजणी व सातबारा तयार करण्याची प्रक्रिया कुडाळ नगरपंचायतीच्या मागणीनुसार सन २०१७-१८ मध्ये करण्यात आली या ठिकाणी कुडाळ नगरपंचायतीमार्फत विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी शासकीय जमिनीची मागणी करण्यात आली होती दरम्यान या ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करणारे गुरूनाथ पेंटर (चव्हाण) यांनी या शासकीय जमिनीमधील १.४५ गुंठे जमीन मिळावी म्हणून मागणी केली. मुळात ही जमीन ७ गुंठे असून कुडाळ नगरपंचायत व बांधकाम विभागाचे रस्ते या जमिनीच्या बाजूने जातात त्यामुळे भविष्यात रस्ता रुंदीकरणांमध्ये ही जमीन मोठ्या प्रमाणावर जाणार आहे.
या शासकीय जागेमध्ये गेले अनेक वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील आंबेडकर अनुयायी जयंती उत्सव, महापरिनिर्वाण दिन, बौद्ध पौर्णिमा असे विविध उत्सव तसेच उपक्रम करीत आहे या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे म्हणून आंबेडकर अनुयायी यांनी ही जमीन कुडाळ नगरपंचायतीला देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याजवळ केली होती मात्र जिल्हाधिकारी यांनी या मागणीचा कोणत्याही प्रकारे विचार न करता जिल्हाधिकारी यांचे निवासी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, कुडाळ तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी या शासकीय जमिनीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले ज्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या गुरूनाथ पेंटर यांच्यावर कारवाई न करता ही जमीन त्यांना कशी देता येईल याचे प्रयत्न सुरू केले हे सर्व अधिकारी कर्मचारी जातीयवादी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वेषी असल्याचा आमचा संशय असून त्यांनी ही जमीन बहाल करण्यासाठी आर्थिक तडजोड केल्याचाही संशय आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणी गुरुनाथ पेंटर (चव्हाण) यांना ही जागा कशी देता येईल त्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज खोटे बनवून पंचयाद्या खोट्या घालून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मुळात या ठिकाणी गुरुनाथ पेंटर किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही. मात्र, गुरुनाथ पेंटर (चव्हाण) यांचा भाऊ कविलकट्टा कोतवाल म्हणून कार्यरत असल्यामुळे आणि हा कोतवाल निवासी जिल्हाधिकारी यांचा घरगडी असल्यामुळे त्यांच्या बाजूने सर्व अहवाल तयार करण्यात आले आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते मागासवर्गीयांचे नाही तर जगाला ते आदर्शवत असे ते महामानव आहेत त्यांनी लिहिलेल्या लोकशाहीवर सध्या देश सुरू आहे आणि त्यांच्या स्मारकाला ज्यांच्या कायद्यामुळे जे अधिकारी बनले आहेत ते अधिकारी विरोध करत आहेत. अशा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी तसेच अनधिकृत बांधकाम केलेल्या गुरुनाथ पेंटर यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या निवासी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागून लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे लागेल असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी म्हटले आहे.