व्यवस्थेत हस्तक्षेप करण साहित्यिकांच काम...!

▪️ तरूणांना स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडाव लागेल : प्रा. वैभव साटम 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!
Edited by:
Published on: May 25, 2024 13:42 PM
views 64  views

पुष्प-३१ वं


कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनल कोकणसाद LIVE च्या 'जागर' 'कोकणच्या साहित्य रत्नांचा', या विशेष कार्यक्रमात मुंबईत राहून देखील कोकणीपण जपणारे लेखक, साहित्यिक प्रा. वैभव साटम यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा या विशेष कार्यक्रमातील हे ३१ वं पुष्प आहे. दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.

मुलाखत

पुष्प : ३१ वं.

लेखक प्रा. वैभव साटम

.लेखक वैभव साटम, मुलाखत

१. भौतिकशास्त्रात असताना साहित्याकडे तुम्ही कसे वळला ?

माझा जन्म मुंबईचा. त्यानंतर तीन वर्षे गावी होतो. यावेळी इथल्या बोलीचा पडलेला पगडा मी विसरू शकलो नाही. मनावर तो ठामपणे बसला. मूळ वैभवाडीतील तीथवली गावचे तावडे सर यांनी साहित्याची गोडी आम्हाला लावली. मोठं मोठी पुस्तक आम्हाला त्यांनी वाचायला लावली. कवीवर्य डॉ वसंत सावंत व तावडे सर हे दोघे मालवणला एकत्र शिकत होते. साहित्य वाचनाची सुरुवात शालेय जीवनापासून माझी झाली. विक्रोळी सारख्या परिसरात कोकणी माणसं होती. कामगार वर्ग मोठा होता. हे सगळा बघता मी चुकून भौतिकशास्त्राकडे गेलो असं म्हणावं लागेल. दहावीला चांगले टक्के मिळाल्याने मी विज्ञानाकडे गेलो. गणिताशी संबंधित असल्याने भौतिकशास्त्राकडे वळलो. पण, साहित्याची गोडी लागली ती शाळेमुळे. अकरावीला असताना कविवर्य डॉ.‌वसंत सावंत निवृत्त होऊन मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांची आणि माझी भेट झाली. त्यानंतर साहित्याच्या मुळाला पावली फुटली असं म्हणावं लागेल. माझे वडील देखील वाचक होते. त्यांना वाचनाची आवड होती. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे साहित्याची गोडी निर्माण झाली. मोठमोठ्या ग्रंथालयाचा सहवास लाभला. 


*२.लेखनाची सुरूवात कशी झाली ?*

डॉ. वसंत सावंत यांची १५ ऑगस्टला ओळख झाली. त्यांनी यावेळी नुकतीच लिहीलेली कविता मला वाचून दाखवली. मी पहिला वाचक होतो. यावेळी आपणही लिहावं असं मला वाटल. रूईया विद्यापीठात साहित्य, संस्कृती, क्रीडा जोपासता येत होती‌.‌ मोठमोठे साहित्यिक इथे यायचे. शंकर वैद्य सर यांचीही भेट झाली. कॉलेज जीवनात कवीतांनी माझी सुरूवात झाली. मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमात शंकर वैद्य सरांना मी कविता दाखवली. त्यांनी माझ्या कविता पाहून या कविता तुझ्या वाटत नाही असं सांगितलं. यावर मीच कविता लिहिल्याचे सांगितले. त्यावर ते म्हणाले तुझ्या वाटत नाहीत याचा अर्थ यावर वसंत सावंत, मंगेश पाडगांवकर यांचा प्रभाव दिसतो. तुझी कविता यात दिसत नाही. साहित्याचा आपला पिंड ओळखायला शिक असा संदेश त्यांनी दिला. 


*३. गेल्या २० - २५  वर्ष आपण लिहिताय. आणि विशेष म्हणजे आपण साहित्यितील बहुतांश अंगाना स्पर्श केलाय. कविता, कथा, कादंबरी, ललीत लेखन, बालसाहित्य, मालवणी कवितांचं संकीर्ण करताय?*

१९८१ साली विक्रोळीत आलो. पहिली तीन वर्षे कोकणात होतो. वडील मुंबईला नोकरी करत होते. आजूबाजूला सगळी कोकणी माणस होती. बोलीचालीची भाषा ही मालवणी होती. मी कोकणातून मुंबईत गेलेलो.‌ लहान वयात झालेले मालवणीचे संस्कार विसरू शकलो नाही.‌ दरवर्षी मे महिन्यात आम्ही गावी यायचो. मिरग संपला की पुन्हा मुंबई गाठायचो. माझ्या काकांची पिठाची गिरण होती. त्यावर दळण देण्यासाठी भरपूर लोक यायची. तर गावात घरात पोस्ट ऑफिस होत मोठे काका पोस्टमास्तर होते. या निरिक्षणातून व्यक्ती चित्रण माझ्या हातून घडली. त्याचा पाया हा होता. माझे काका गावी शिकले होते. नोकरीला मुंबईत होते. घरातील वातावरण देखील मालवणी मुलखातील होत. त्यामुळे कोकणशी नाळ जोडलेली राहीली.


*४. कोणत्या प्रकारच साहित्य विशेष भावत ?*

'कोकणी माती' ही दीर्घकथा मी लिहीली. गावातील रूढी, तिथली माणसं त्यांची स्वभाव वैशिष्टे यातून लिहीली. वसईच्या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली. यानंतर भिरवंडेच्या प्रकाश जाधव यांनी या दीर्घ कथेचं लघू कादंबरीत व्हावं यासाठी विचारलं. त्यातून लघु कादंबरी तयार झाली. साहित्यातील माझं पहिल पुस्तक प्रकाशित झालं. वसईला कोकण मराठी साहित्य परिषदेच संमेलन झाले होते. यावेळी कोकणातील अनेक मंडळी तिथे होती‌. त्यांना पाहून आपलही साहित्य येईल का ? अस वाटल. नंतर माझी पुस्तके येत गेली. महेश केळुसकर यांनी मला लिहीत केलं. 


*५. मुंबईत असला तरी मालवणी बाबत आपणास विलक्षण आकर्षण आहे. मालवणी भाषेवर आपण गाडा अभ्यास केलाय काय सांगाल.*

मालवणी बोलीच आजूबाजूला होती. त्याचा प्रभाव होता. मायबोली मालवणी राहीली. बोली भाषेबद्दल अनेकांनी लिहीलं त्यामुळे मालवणी भाषेवर आपण लिहाव असं वाटलं. आज पहिल तर मालवणी बोलीला महत्व आले आहे. समाजमाध्यमांवर मालवणीचा प्रभाव वाढत चालला आहे. मालवणीचा न्यूनगंड कमी होत चालला आहे. येणारा काळ मालवणीसाठी चांगला असेल‌


*६. आपल्या प्रकाशित झालेल्या कादंबरी, कथासंग्रह, ललितसंग्रह, बालसाहित्य यावर कसा प्रकाश टाकाल.*

कोकण हा निरंतर चिंतनाचा विषय असला तरी साहित्य हे मनोरंजनाच साधन नाही. साहित्यिक हा व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी लिहीतो. व्यवस्थेवर आपल्याला चांगली टीका करायची आहे. जे चुकीचं आहे ते मांडायच आहे. कादंबरी, कथासंग्रह, ललितसंग्रह यातून ते मांडता येत. सामान्य माणसाच जगणं त्यातून मांडायच आहे. मी शैक्षणिक क्षेत्रात असताना शिक्षकांची अवस्था यावर मी लेखन केलं आहे. शिक्षकांना भेडसावणारे प्रश्न कथेच्या माध्यमातून मांडले. कोरोना सारख्या संकंटानंतर समाजातील वास्तवाबद्दलची मांडणी केली. 


*७ . कोकणात गावोगावी आज माणसे गावकी आणि भावकी यातच अडकलेली आहेत. सहा माणसांच्या सहा गोष्ठी आपण हेच आपल्या व्यक्तिचित्रण पुस्तकात रेखाटलं काय आहे हे नेमक व्यक्तिचित्रण.* 

बिटकी आणि पाणंद हे ग्रामिण व्यवस्थेवरील ललित लेख आहेत.  काही गोष्टी लोप पावत चालल्या आहेत‌. यावर ललित लेखातून लेखन केलं. काही शब्द आपल्या शब्दकोशातून नाश पावतील असं वाटतं असताना पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचावे यासाठी ललितच्या माध्यमातून लिहील. माणसांमधील विसंगती दिसायला लागली होती‌. गावकी आणि भावकी यातून काही प्रवृत्तीवर लेखन केलं. बारा व्यक्तीचित्रणं यातून केली आहेत. गावात रहाणारी व भावकीत रहाणारी ही माणसं आहेत. सहा माणसांच्या सहा गोष्टी या दीर्घकथा आहेत. या सहा व्यक्ती व्यवस्थेमधून आलेल्या समस्या व त्याच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या आहेत. ग्रामीण भागातील मुल शेती करत असल्यान लग्न व्यवस्थेनं त्यांना नाकारलं आहे. यावर भाष्य करणाऱ्या या सहा कथा आहेत. समाजात पूर्वीपासून पगडा बसला आहे. शहरांकडे अधिक ओढा आहे. पुढची पिढी हा पगडा सोडत नाही तोवर हा प्रश्न असाच राहिल. यासाठी गावात काहीतरी करता येईल का ? याचा विचार करावा लागेल. गाव ओस पडत चालली आहेत हा जटिल प्रश्न बनत चालला आहे. व्यवस्थेने हा प्रश्न दुर्लक्षीत ठेवला आहे. त्यांचे परिणाम आजची पिढी सोसत आहेत.


*९.  कोकण खऱ्या साहित्य रत्नांची खाण आहे. आजची पिढी यात मागे नाही. त्याबद्दल काय सांगाल?*

साठोत्तरी साहित्यात कोकणातील प्रश्न वेगळे होते. आता कोकण बदलत चाललं आहे. बदलत्या कोकणचे प्रश्न बदलत्या पिढीने आता घेतले आहेत. राजकीय, समाज, संस्कृती संदर्भ घेऊन त्यांनी लेखन केलं आहे. साहित्य हे मनोरंजनाच साधन असू शकत नाही. साहित्य कधीही अक्षर होणार नाही. लेखन त्याची भाषा बदलत्या काळानुसार बदलत जाणार आहे. 


*१०. आपला जन्म मुंबईत पण मूळ कोकणशी जोडलेला आहे. काय सांगाल कोकणा बाबत.*

शहरातील परिस्थिती देखील आता चांगली राहिली नाही. भौतिक गरजा शहरात पूर्ण करणं कठीण झालं आहे. लखलखीत शहारत केवळ मुलामा राहिला आहे. आतल वास्तव खूप वेगळं आहे. बिल्डींगच्या मागच्या झोपडपट्ट्या आपणाला दिसत नाहीत. ग्रामिण तरुणांना हे वास्तव लक्षात घ्याव. आपल्या जगण्यातील स्थायीभाव लक्षात घ्यावे. कोकणाला साधन संपत्ती, समृद्र, निसर्ग संपदा प्रचंड आहे. त्यामुळे करण्यासारख्या भरपूर गोष्टी कोकणात आहेत. इथल्या तरुणाला स्वतःच्या संघर्षासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतः झगडावं लागणार आहे.


शब्दांकन -विनायक गांवस 

छाया -प्रसाद कदम