पाटकर हायस्कूलच्या उन्नतीसाठी शैक्षणिक प्रयोग करण्याचा मानस : विलास गावडे

पाटकर हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: February 04, 2024 15:09 PM
views 383  views

वेंगुर्ला : पाटकर हायस्कूलच्या उन्नतीसाठी आगामी काळात अनेक नवनवीन शैक्षणिक प्रयोग करण्याचा मानस आहे. त्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व अनुभवाधिष्ठित व्यक्तींची नितांत गरज आहे. आपण सर्वजण मिळून संस्थेच्या उभारणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे प्रतिपादन उद्योजक विलास गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले. 

वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटी संचालित रा. कृ. पाटकर हायस्कूल आणि रा. सी. रेगे कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय व तंत्र विभाग वेंगुर्ला यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास प्रभाकर गावडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रुपेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईप्रसाद नाईक, पालक - शिक्षक संघ उपाध्यक्ष जयवंत मालंडकर, प्रशालेचे मुख्याध्यापक आत्माराम सोकटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शेटये, कलावलय संस्थेचे रंगकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खामकर, प्रीतम वाडेकर, दाभोली प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर सोन्सुरकर, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ मालंडकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प व रोख रक्कम बक्षिस देऊन गौरविण्यात आले.

आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं, नाव कमवावं. समाजात स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करावं, अधिकारी व्हावं आणि आपले नाव रोशन करावं, अशी विविध स्वप्नं आई-बाबा पाहत असतात.  आई-बाबांच्या या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम करून अभ्यासाने गुणवत्ता सिद्ध करावी व जीवनात उज्वल यश संपादन करून आई-बाबांचे स्वप्न पूर्ण करावे, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील यांनी येथे व्यक्त केले.

पाहुण्यांचा परिचय सहाय्यक शिक्षिका एम. एम. खरात यांनी केला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आत्माराम सोकटे यांनी केले.  अहवाल वाचन सहाय्यक शिक्षिका एम. एम. मांजरेकर यांनी केले तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे वाचन सहाय्यक शिक्षिका एस. एस. जाधव यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ प्रा. महेश बोवलेकर यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ मालंडकर यांनी मानले. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक व्ही. बी. गोसावी,  एस. आर. धुरी, सौ. एस. एस. पिळणकर,  जी. टी.  बागुल,  एस. जे. पेडणेकर, एस. डी. परब यांसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. दरम्यान, सायंकाळी विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.