
चिपळूण : समाजातील शैक्षणिक प्रगतीला गती देत चिपळूण मुस्लिम समाजाच्यावतीने एक आगळावेगळा उपक्रम – गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा – रविवार, २७ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजता चिपळूण मुस्लिम समाजाच्या मल्टीपर्पज सेंटर येथे हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न होणार असून, समाजातील शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार केला जाईल.
या उपक्रमाच्या माध्यमातून चिपळूण मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण निर्माण केले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे केवळ अभिनंदन नव्हे तर त्यांच्यातील आत्मविश्वास आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते जागतिक दर्जाचे प्रेरणादायी वक्ते व समुपदेशक श्री. ऐहसान शेख यांचे मार्गदर्शन. त्यांच्या अनुभवसंपन्न आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना जीवनात योग्य दिशा निवडण्यास मदत होणार असून, भावी आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक तयारीही त्यांच्याद्वारे मिळणार आहे.
या सन्मान समारंभात समाजातील मान्यवर व्यक्ती, शिक्षकवर्ग, मार्गदर्शक मंडळी, पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे, प्रमाणपत्रे आणि प्रेरणादायी संदेश देऊन गौरवण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये केवळ स्पर्धेची भावना नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्व, शैक्षणिक प्रामाणिकपणा आणि आत्मभान जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यामागे कुटुंब, शिक्षक आणि समाज यांचे योगदान असते, हे जाणून विद्यार्थ्यांना अधिक सजग आणि कृतज्ञतेने यशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देण्याचा समाजाचा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाचे नियोजन चिपळूण मुस्लिम समाजाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रमपूर्वक केले असून, समाजातील सर्व घटकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.