
वैभववाडी : करूळ घाटरस्त्यांची काल (ता.२४) सायकांळी उशिरा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पाहणी केली. घाटरस्त्यात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सुचना त्यांनी ठेकेदार व संबंधित विभागाला दिल्या.मात्र घाटमार्गातून वाहतुक सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे हा घाटमार्ग सुरू होण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
तळेरे-कोल्हापुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या वर्षी पासून सुरू आहे.या महामार्गावरील करूळ घाट कॉक्रीटीकरणासाठी २२ जानेवारी २०२४ पासुन बंद आहे.पावसाळ्यापुर्वी करूळ घाटरस्त्यांपैकी ६ कि.मी लांबीची एक बाजु पुर्ण झाली होती.त्यानतंर पावसाळा संपताच पुन्हा हे काम सुरू झाले.सद्या करूळ घाटातील कॉक्रीटीकरणाचे काम पुर्ण झाले आहे.हा घाटमार्ग बंद असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.सध्या या महामार्गावरून सरासरीच्या १० टक्केच वाहतुक सुरू आहे.त्यामुळे वैभववाडी,तळेरे, बाजारपेठेतील व्यापारी मेटाकुटीस आले आहेत.अनेक हॉटेल्स बंद झाली आहेत.त्यामुळे हा घाटमार्ग सुरू करावा अशी मागणी सातत्याने होत आहे.घाटमार्गातील कामांचा आढावा घेण्यासाठी मागील महिन्यात पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचा पाहणी दौरा झाला होता.त्यावेळी संबंधित ठेकेदाराला १०जानेवारी पर्यंत घाटातील कामे मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.मात्र त्यानंतरही घाट मार्गातील कामे प्रलंबित आहेत.तसेच गुणनियंत्रण पथकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने अधिकची कामे सुचवली आहेत.ती देखील होणं बाकी आहेत.घाटमार्ग सुरू करण्यासाठी ठाकरे शिवसेना आग्रही आहे.त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.२०) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
दरम्यान, काल सायकांळी उशिरा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी करूळ घाटरस्त्यांची पाहणी केली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपुर्ण सुचना केल्या आहे.घाटरस्त्यांमध्ये अर्धवट स्थितीत असलेले गटाराचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे. दरीकडील बाजुला क्रॅश बॅरियर्स उभारण्यात यावेत.याशिवाय एडगाव ते करूळ येथील रस्ता वाहतुकीयोग्य बनविण्याची सुचना त्यांनी केली.तसेच राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांनी सोमवारी (ता.२७)रोजी ओरोसला बोलविले आहे. यावेळी सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी घाट वाहतुकीबाबत कोणतेही सकेंत दिलेले नाहीत.त्यामुळे करूळ घाटातुन वाहतुक नेमकी कधी सुरू होणार याकडे वाहनचालक व व्यापारी यांचं लक्ष लागून राहिले आहे.