वैभववाडीतील विस्तार अधिकाऱ्यांकडील अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी करा

भाजपा कार्यालय प्रमुखांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 20, 2023 14:46 PM
views 876  views

वैभववाडी : तालुक्यातील पंचायत समिती विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे यांच्याकडील अपंगत्व प्रमाणपत्र आणि त्यांनी एका संस्थेला दिलेल्या ४ लाख देणगीची चौकशी व्हावी. याशिवाय ते तालुक्यातील अनेक सरपंचाशी ते उध्दट वागतात.  त्यामुळे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपा कार्यालयप्रमुख अनंत फोंडके यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन श्री. फोंडके यांनी दिले आहे. हांडे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. त्यांच आणखी एक प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

     राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान प्रशिक्षणातील कथित भष्ट्राचार प्रकरण, पीपीई कीट यासह विविध प्रकरणामुळे चर्चेत आलेले येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे यांचे आणखी एक प्रकरण भाजपाचे कार्यालय प्रमुख श्री.फोंडके यांनी उघडकीस आणले आहे. श्री.हांडे हे रस्सीखेच सारख्या मैदानी खेळामध्ये सहभागी होतात. तशी नोंद पंचायत समितीच्या हालचाल नोंदवहीमध्ये आढळुन येत आहे. असे असताना त्यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडुन आपण ६१ टक्के अपंगत्व प्रमाणपत्र मिळविले आहे. ते २ फेब्रुवारी २०२३ रोजी ओरोस येथे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या रस्सीखेच स्पर्धेत सहभागी असल्याची छायाचित्र, व्हीडीओ आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे काय मिळु शकते, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. याशिवाय त्यांनी करमुक्तीसाठी एका संस्थेला ४ लाख रूपये दिले आहेत. यापुर्वी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान प्रशिक्षणात अपहाराचा ठपका त्यांच्यावर होता.याशिवाय कोरोना काळातील पीपीई कीट प्रकरणात देखील त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यांच्याकडुन नवनिर्वाचीत सरपंचाना अपमानकारक वागणुक दिली जाते. मी अपंग असुन माझे कुणीही काहीही करू शकत नाही, असा अविर्भावात ते वागतात. त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे तालुक्यातील ग्रामीण विकासाला खीळ बसली आहे. तरी त्यांची तातडीने चौकशी होऊन ते दोषी आढळलेस त्यांच्यावर निलबंनाची कारवाई करावी, अशी मागणी देखील श्री.फोंडके यांनी केली आहे.

याबाबत श्री हांडे यांच मत जाणून घेतले असता ते म्हणाले, मी गेल्या काही वर्षापासुन विविध आजारांनी त्रस्त आहे. मला मणक्याचा आजार आहे. त्यातुन दोनही पायांना बधीरता आली आहे. हाताच्या काही भागाला सवेंदना नाहीत. तीन ते चार डॉक्टरांकडुन माझ्यावर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे मला अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. रस्सीखेच स्पर्धेत गटविकास अधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर सहभागी झालो. त्याचा त्रास देखील मला झाला. याशिवाय मी काही सामाजिक संस्थांना देणगी देतो. तशीच अलीकडे देखील एका संस्थेला देणगी दिलेली आहे.