मुणगे भगवती देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास २ जानेवारीपासून सुरुवात

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: December 23, 2025 19:29 PM
views 26  views

देवगड :  देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदेवता श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव 2 जानेवारी पासून  सुरू होत असून या यात्रोत्सवाचे पाच दिवसाचे नियोजन श्री.भगवती देवस्थान कडून चोख असे करण्यात आले आहे.

नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या देवगड तालुक्यातील मुणगे येथील ग्रामदेवता श्री देवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव २ ते ६ जानेवारीदरम्यान साजरा होणार आहे.त्यासाठी या यात्रोत्सवाचे चोख नियोजन करण्यात आले आहे.भाविकांना गाभाऱ्यात रांगेतून जावून कमीत कमी वेळेत थेट दर्शन मिळण्यासासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्रसिद्ध या जत्रोत्सवासाठी मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग,रत्नागिरी आदी ठिकाणाहून भाविक येतात. दरम्यान,जत्रोत्सवाच्या नियोजनाबाबत देवी भगवती मंदिर येथे मुणगेवासीयांची ग्रामसभा देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी येणाऱ्या भाविकांना देवीची ओटी भरणे व देवीचे दर्शन तातडीने होण्यासाठी रांगांची शिस्तबद्ध व्यवस्था करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.सजावट, प्रवेशद्वार आणि विद्युत रोषणाईचे काम जत्रोत्सवापुर्वी पूर्ण करण्याबाबत ग्रामस्थांमधून मान्यता देण्यात आली.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.बाहेरगावातून येणाऱ्या भजन मंडळांनी आगावू नोंद करावी व आपला दिवस आणि वेळ ठरवून घेण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त कृष्णा ऊर्फ दादा सावंत आणि पुरषोत्तम तेली यांच्याशी संपर्क साधावा. जत्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेतून तातडीने दर्शन देण्यात येईल.मंदिराची व मंदिराच्या बाजुच्या मंदिरांची सफाई केली असून मंदिर परिसर पार्किंगची व्यवस्था आदी कामांचे नियोजन करण्यात आले.यावेळी इतर विविध विषयांवरही चर्चा करुन नियोजन करण्यात आले. देवस्थान सचिव निषाद परुळेकर यांनी  यावेळी सर्वांचे आभार मानले. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, सदस्य कृष्णा ऊर्फ दादा सावंत, अनिल धुवाळी, रामचंद्र मुणगेकर, मनोहर मुणगेकर, पुरूषोत्तम तेली, प्रकाश सावंत, देवस्थान लेखनिख रामतीर्थ कारेकर, दिलीपकुमार महाजन आदी उपस्थित होते.