
मालवण : जिल्ह्यात होणाऱ्या उपोषण, मोर्चा, संप, निदर्शने, रास्ता रोको यांसारख्या प्रकारामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या निषेध मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला सण असे उत्सव साजरा करण्यात येत आहेत. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यापूर्वी राज्यात उत्सवाच्या कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्यामुळे राज्यातून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झाल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यातून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात विविध समाजाचे लोक आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषण आंदोलने करत आहेत तसेच सोशल मीडियावर समाजकंटकांकडून धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट व व्हिडिओ प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचेही पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. यातच राजकोट किल्ला येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शहरात निषेध मोर्चा होणार आहे. या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा सुव्यवस्था याचे पालन व्हावे या दृष्टिकोनातून संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले आहे.