
दोडामार्ग : "हत्ती आले रे आले" असे गोड आवाजात म्हणत गावकरी कधी काळी हत्तीच्या पावलांची पूजा करत असत. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. "हत्ती नको रे बाबा" म्हणत लोक त्यांना पिटाळून लावत आहेत. काही लोक अपवाद आहेत.
तिराली खोऱ्यातील हत्ती संवर्धनाच्या विषयावर आधारित एक आगळावेगळा उपक्रम सरकारी प्राथमिक विद्यालय, साळ पुनर्वसन शाळा येथे राबवण्यात आला. “हत्ती येता दारी...” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात, शाळेतील ४ थीच्या विद्यार्थ्यांनी ‘नंदू हत्ती बरोबर एक दिवस’ या पाठातून प्रेरणा घेत, हत्ती व त्याच्या संवर्धनाविषयी थेट अनुभव घेण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले, हत्तीप्रेमी संजय सावंत यांच्या घराला दिलेली भेट. संजय सावंत हे स्वतः हत्ती प्रभावित क्षेत्रातील बाबरवाडी - आयनोडे येथील रहिवासी असून, सध्या साळ पुनर्वसन गावात वास्तव्य करत आहेत. विद्यार्थ्यांनी हत्तीचे मुखवटे घालून हत्तीप्रमाणे कळपात चालत त्यांच्या घरी पोहोचले. वर्गातील हरएक विद्यार्थिनीने पाठाचा सारांश सादर केला.
यानंतर अक्षय मांडवकर यांनी संकलित केलेली तिराळी खोऱ्यातील हत्तींच्या वास्तव्यासंबंधी माहिती देणारी डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली.
संजय सावंत यांनी त्यांच्या अनुभवांद्वारे हत्तींच्या हालचाली, संवेदनशीलता, व त्यांना त्रास होणाऱ्या कारणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या बोलण्यातून हत्तींच्या बारकाव्यांचे चित्र उभे राहिले. वर्गातील जवळपास २५% विद्यार्थी हत्ती प्रभावित क्षेत्राशी निगडित आहेत. काहींचे घरे, तर काहींचे नातेवाईक अशा गावांत राहतात. त्यामुळे हत्ती हा विषय त्यांच्या घरगुती संवादाचाही भाग बनला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्या मोठ्यांकडून ऐकलेले अनुभव, प्रश्न कार्यक्रमात मांडले आणि समाधानकारक उत्तरे मिळवली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश हत्तींच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणे हा होता. अलीकडे हत्ती मृत्यूच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. त्यामुळे मानव-हत्ती संघर्ष आणि त्यावरील उपाय यांविषयी संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे.
या संपूर्ण उपक्रमात परिसर अभ्यास शिक्षक संकेत नाईक व मुख्याध्यापक धाकटू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रश्नोत्तरं, चर्चासत्र, प्रत्यक्ष अनुभव यामुळे विद्यार्थ्यांची समज समृद्ध झाली. हा उपक्रम निसर्गसंवर्धनासाठी एक आदर्श पाऊल ठरले असून, इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल.