
मंडणगड : मंडणगड तालुक्यातील बाणकोट व वेसवी या गावांचे परीसरामध्ये मोठ्या प्रमाणावर डेंग्यू संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागास प्राप्त झाली आहे. तालुका आरोग्य विभागाने ही माहीती कळताच तातडीने या दोन्ही गावांचे परिसरात भेट दिली तेथील सर्दी व तापाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मांडणगड तालुका आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाने सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी 6 कर्मचार्यांचे पथक तत्काळ घटनास्थळांचे गावात पाठवण्यात आले. यावेळी पथकाने 350 घरे, 490 महीला व पुरुष नागरीकांची तपासणी केली. यावेळी 423 कंटेनर तपासण्यात आले दुषीत कटेनर नष्ठ करण्यात आले. सर्दी ताप खोकला असलेले 8 रुग्ण ताप असलेले 8 रुग्ण यांची तपासणी करण्यात आली त्यानुसार नमुद ठिकाणचे ग्रामस्थांना घ्यावयाच्या काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मध्ये कार्यवाही बद्दल माहिती देण्यात आली व पुढील सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी. अंगावर ताप, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, त्वचेवर चट्टे येणे अशा लक्षणांची जाणीव झाल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंडणगड तालुका आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने संयुक्तरित्या खालील उपाययोजना सुरू केल्या आहेत
फॉगिंग आणि अँटी-लार्वा औषध फवारणी - डेंग्यू संसर्गाचा धोका असलेल्या भागांमध्ये सकाळ व संध्याकाळी फॉगिंग केली जात आहे. साचलेल्या पाण्यात डासांची पैदास रोखण्यासाठी अँटी-लार्वा औषध फवारणी केली जात आहे.
सर्वेक्षण मोहिम- आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोगरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. ताप, अंगदुखी इ. लक्षणे असलेल्या व्यक्तींची नोंद केली जात आहे. जलस्त्रोत व पाण्याची साठवणूक तपासून डासांच्या उत्पत्तीची शक्यता कमी करण्यासाठी निर्देश दिले जात आहेत.
स्वच्छता मोहीम तालुक्यात ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. साचलेले पाणी, प्लास्टिकच्या बाटल्या, टायर, नारळाच्या करवंट्या यांचे विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांना निर्देश दिले आहेत.
आरोग्य तपासणी शिबिरे- संभाव्य धोकादायक भागांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. ताप व अन्य डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या नागरिकांना तत्काळ उपचार व रक्त तपासणीची सोय उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांना आवाहन- घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका, आठवड्यातून एकदा तरी पाण्याचे साठे (टाकी, ड्रम, कूलर इ.) स्वच्छ करा. पूर्ण बाहीचे कपडे वापरा व डासांपासून संरक्षणासाठी जाळी/मॉस्किटो रेपेलंटचा वापर करा. ताप आल्यास घरी औषधोपचार न करता जवळच्या आरोग्य केंद्रात त्वरित तपासणी करावी. डेंग्यूची लक्षणे – ताप, डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, त्वचेवर लाल चट्टे इत्यादी दिसल्यास गांभीर्याने घ्या. नागरीकांनी खाजगी रुग्णालय आणि तपसणी केंद्र येथे असे रुग्ण आल्यास त्यांची माहिती आरोग्य अधिकारी कार्यालयास देणे बंधनकारक आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाही करण्यात येणार आहे. तालुका आरोग्य विभाग मांडणगड सर्व नागरिकांसोबत आहे आणि सदर परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रीया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांनी दिली आहे.