
वैभववाडी : तालुक्यातील कुसुर रामेश्वर दारुबाई मंदिरानजीक अतिवृष्टीमुळे खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती अद्याप झाली नाही. दोन वर्षे उलटली तरी मार्गाची दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होत आहे. कुसुर कुंभारी ते मधलीवाडी या रस्त्याचे पंतप्रधान सडक योजनेतून काम झाले. दोन वर्षांपूर्वी या मार्गाच्या नुतनीकरणाचेही काम झाले. यानंतर या मार्गावरील रामेश्वर मंदिर नजीकचा रस्ता सन २०२१ च्या अतिवृष्टीत खचला आहे.यावेळी लोकप्रतिनिधी व जि.प.बांधकाम विभगाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी देखील केली होती. मात्र अद्यापही मार्ग सुरळीत झाला नाही. सध्या या ठिकाणाहून ऐकेरी वाहतूक सुरू आहे. या संबंधी येथील नागरिकांनी संबंधित विभागाला लेखी निवेद्वारे कळविले. मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेली नाही. खचलेल्या या रस्त्यामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या घरांना धोका पोहचण्याची शक्यता देखील अधिक आहे.
तालुक्यातील करुळ व भुईबावडा या दोन घाटमार्गांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे.पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र सध्या या मार्गावरून अवजड वाहतूक नेणे धोक्याचे बनले आहे.दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. येत्या काही दिवसांत हा संपूर्ण रस्ता खचून मार्ग पुर्णतः बंद होणार आहे. तत्पूर्वी संबंधित विभागाने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.