भारतीय रेल्वेला 'सुवर्णकाळ' : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 16, 2023 15:05 PM
views 176  views

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचा सध्या गोल्डन पिरियड अर्थात सुवर्णकाळ सुरू आहे. रेल्वेला हा सुवर्णकाळ आणण्यात कर्मचाऱ्यांची मोठी ताकद असल्याचे तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय रेल्वेच्या सुवर्णकाळाबाबत वेळोवेळी उल्लेख केल्याचे गौरोदगार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढले. अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार-२०२३’ भारत मंडपम, प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. 


केंद्रीय रेल्वे वाहतूक आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी ६८ व्या केंद्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यात रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सर्वोत्तम कार्यपद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले. विभागीय रेल्वे, पीएसयूंना विशिष्ट क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी शिल्ड प्रदान करण्यात आली. रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्य़कारी अधिकारी आणि सदस्य, सर्व विभागीय रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वेच्या उत्पादन युनिटचे प्रमुख आणि रेल्वेचे सार्वजनिक उपक्रम अधिकारी उपस्थित होते.


देशभरातील एकूण विविध विभागीय रेल्वे, उत्पादन युनिट आणि रेल्वे सार्वजनिक उपक्रमामधील १०० रेल्वे कर्मचारी (५० अधिकारी आणि ५० कर्मचारी) यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवांसाठी २१ शिल्डसह सन्मानित करण्यात आले. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली ट्रेन धावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा केला जातो. रेल्वे सप्ताहादरम्यान संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्ष २०२३ साठी, ७ मध्य रेल्वे अधिकार्‍यांच्या सेवांना प्रतिष्ठित सन्मान देण्यात आला.