मालवणला 4 एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

माजी खासदार निलेश राणे यांची कुडाळ येथे पत्रकार परिषद
Edited by: भरत केसरकर
Published on: April 01, 2023 19:48 PM
views 121  views

कुडाळ : स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मालवण येथे ४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी देऊन या गौरव यात्रेला सर्व हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार असल्याचे त्यांनी कुडाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


कुडाळ येथे भाजपच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.  या पत्रकार परिषदेला ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, मालवण मंडल अध्यक्ष धोंडी चिंदरकर, युवा मोर्चाचे भाई सावंत आदी उपस्थित होते.


यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये १ ते ६ एप्रिल पर्यंत असणार आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये ही गौरव यात्रा असणार असून कुडाळ व मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ एप्रिल रोजी मालवण येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा होणार आहे. यामध्ये कुडाळ व मालवण तालुका सहभागी होणार असून भारतीय जनता पक्षासह हिंदुत्ववादी संघटना या गौरव यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.


संजय राऊत यांना जावई विचारत नाही

संजय राऊत यांना कोण आणि कशासाठी धमकी देणार?  फक्त आपली किंमत आणि संरक्षण वाढवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे. त्यांचा जावई सुद्धा त्यांना विचारत नाही. तर इतर कोण धमकी देणार?  फक्त रोज काहीतरी बोललो पाहिजे म्हणून ते बोलत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.