
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल, सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यम शाळा आणि प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय या तीनही विभागांमध्ये ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सोमवारी अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पावसाच्या धारांमध्येही विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्याचा हा सोहळा साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात युनायटेडच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संचलनाने झाली. गद्रे इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्रगीताच्या गजरानंतर विद्यार्थ्यांनी एकसुरी कवायत प्रकार सादर करून सर्वांचे कौतुक मिळवले.
यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आद्य क्रांतिकारकांचे वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण होते. शिशुविहार, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वासुदेव बळवंत फडके, शहीद भगतसिंग, लोकमान्य टिळक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस, हुतात्मा अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वेशभूषेत मंचावर हजेरी लावली. संबंधित क्रांतिकारकांच्या कार्याचा थोडक्यात परिचय आणि संवाद सादर केल्याने वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमासाठी परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, संकुलातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, शिक्षकवर्ग, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसाळी वातावरणातही देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता.