
सिंधुदुर्ग : राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने शासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे . त्यामुळे २९ ऑगस्ट २०२४ पासून विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारलेला आहे सदर संपामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अनिल राणे अध्यक्ष, प्रदीप सावंत कार्याध्यक्ष, गजानन नानचे सचिव सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना शासनाकडून केराची टोपली दाखवली जात आहे. राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ऑगस्ट २०२४ पासून राज्यातील १७ लाख राज्य कर्मचारी संपावर जाणार असल्याचा निर्णय राज्य समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. या संपात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ सहभागी होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ हे राज्य समन्वय समितीशी सलग्न आहे. जुनी पेन्शन योजना हा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे २९ ऑगस्ट २०२४ पासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयांमध्ये शिक्षकेतर महामंडळ पूर्णतः सहभागी होणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे शिक्षकेदरांची रिक्त पद भरती, शाळांतील शिपाई संवर्गाचे कंत्राटीकरण रद्द करणे आदी मागण्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य महामंडळ संपात सहभागी होत असल्याची माहिती राज्याचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा संघटनेला दिली आहे. तरी या संपात राज्य महामंडळाचे आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन अध्यक्ष अनिल राणे, कार्याध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव गजानन नानचे सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांनी केले आहे.