
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली जनावरांचा उपद्रव सातत्याने वाढत असल्याने येथील शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या ताफ्यालाही हत्तीने अडवण्याची घटना नुकतीच घडली होती. गवेरेडे, माकड, वनगाई यांच्या जोडीला आता बिबटे व हत्ती देखील सिंधुदुर्गवासीयांना त्रास देऊ लागले आहेत. या वाढत्या नुकसानाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. वन्यप्राण्यांना मारण्यास कायद्याने मनाई असल्याने, त्यांच्या उपद्रवावर नियंत्रण आणण्यासाठी माकडांची नसबंदी करावी, अशी मागणी आम्ही पूर्वीच केली होती, असे ब्रिगेडियर सावंत यांनी सांगितले.
"कुत्र्यांची नसबंदी केल्यापासून त्यांची संख्या घटलेली पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे माकडांची नसबंदी केली गेली, तर नक्कीच त्यांची संख्या देखील घटेल." ब्रिगेडियर सावंत यांच्या अर्जाचा स्वीकार डीएफओने केला होता आणि त्यांची व डीएफओची मागणी राज्य सरकारकडे गेली. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली असली, तरी केंद्र सरकार याला मंजुरी देत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
वन्यप्राण्यांचा शिरकाव : मनुष्याने जंगलावर केलेल्या अत्याचाराचा परिणाम म्हणजे हा जंगली प्राण्यांचा उपद्रव आहे, असे मत ब्रिगेडियर सावंत यांनी व्यक्त केले. आपल्या सोयीसाठी मनुष्य मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहे. "जंगलात राहणाऱ्या जनावरांसाठी त्यांची गरज (नैसर्गिक अधिवास) नष्ट झाली, तर ते मानवी वस्तीत शिरकाव करणारच." सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे हत्ती हे जिल्ह्याबाहेरून येतात, त्यामुळे त्यांना अडवण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर मोठे चर मारणे गरजेचे आहे, अशी मागणी ब्रिगेडियर सावंत यांनी केली. शेतकऱ्यांना आपले शेत वाचवता यावे यासाठी सौर कुंपण योजना मोठ्या प्रमाणात मंजूर करण्याची मागणी मान्य झाली आहे. मात्र, सौर कुंपण असताना देखील जर जंगली प्राण्यांकडून नुकसान झाले, तर त्याचे नुकसान भरपाई देखील सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : ब्रिगेडियर सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सर्व विषयांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. "मुख्यमंत्र्यांनी या गोष्टींकडे लक्ष घालून केंद्र सरकारकडून या सर्व परवांग्या (माकडांच्या नसबंदीसह) मंजूर करून घ्याव्यात, असे मला वाटते." शेती हे उत्पन्नाचे साधन असून, अनेक नवोदित शेतकरी तयार होत आहेत. मात्र, असे नुकसान होत राहिले तर शेती करणे कठीण होणार आहे. म्हणून, सरकारने शेती संरक्षक योजना तातडीने अमलात आणाव्या, असा ब्रिगेडियर सावंत यांचा सरकारकडे आग्रह आहे.
या पत्रकार परिषदेत ब्रिगेड सुधीर सावंत, प्राचार्य विलास सावंत कृषी कॉलेज किर्लोस, प्रदीप सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.











