कोकण रेल्वेची भारतीय रेल्वेत विलिनीकरणासाठी वाढती मागणी !

मिहीर मठकर यांनी वेधलं लक्ष ; खासदारांनी दिला दिलासा
Edited by: विनायक गावस
Published on: August 14, 2023 14:54 PM
views 1606  views

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या मागण्या आणि गैरसोई संदर्भात खासदार विनायक राऊत यांचे माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू मिहिर मठकर यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. खासदार राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनससह प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात मिहीर मठकर यांनी त्यांच लक्ष वेधत हे काम पूर्णत्वास न आल्यास कोकण रेल्वेच भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याबद्दल कोकणवासीयांना जोर धरावा लागेल अशी भावना मठकर व्यक्त केली. याप्रसंगी सावंतवाडीकरांनी निराश होऊन जाऊ नये, रेल्वे टर्मिनसच्या दर्जावाढीकरीता सर्वचजण प्रयत्नशील असून त्याचा पाठपुरावा करत असल्याच खासदार विनायक राऊत म्हणाले. याप्रसंगी रेल्वे अभ्यासक विनोद नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, युवासेनेचे सागर नाणोसकर, कौस्तुभ गावडे आदी उपस्थित होते.


रेल्वे टर्मिनस टप्पा १ चे काम जेमतेम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णपणे बंद आहे. ते काम माघारी गेलेला ८.१४ कोटीचा निधी पुन्हा उपलब्ध करून चालू करण्यात यावं अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत निधी मंजूर करून घ्यावा, सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा, स्थानकाचा पर्यटनदृष्ट्या विकास करावा, सावंतवाडी रेल्वे स्थानकाची नवी इमारत बांधावी,

PRS सुविधा पुर्णवेळ उपलब्ध करावी, फॅटफॉर्म क्रमांक १ व प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ला जोडणारा FOB ला पूर्ण शेड टाकावी,कोरोना काळात काढून घेतलेल्या गाड्यांचे थांबे परत द्यावेत अशी मागणी केली. राजधानी एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे कोरोना काळात बंद केले ते त्वरीत पूर्वरत करण्यात यावेत, तर सावंतवाडी रोड स्थानकावर काही ठराविक रेल्वे गाड्या थांबतात त्यामुळे दिल्ली, विदर्भ, गुजरात व इतर ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांचा पर्याय येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रवासी असताना देखील इतर स्थानकावर जावे लागते. त्यासाठी छ.शि.म.ट मुंबई एक्सप्रेस, संपर्क क्रांती एक्सप्रेस,  नेत्रावती एक्सप्रेस, एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, नागपूर स्पेशल एक्सप्रेस, मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबे द्यावे यासह पेडणे - कारवार या मेमु रेल्वेगाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करावा, प्रवाशांचा सुविधेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १,२ व ३ वर शेड उभारावी अशी मागणी केली आहे. निधीच्या कमतरतेमुळे "सावंतवाडी टर्मिनस" नावारूपास येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी निधीची उपलब्धता करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


दरम्यान, सावंतवाडीकरांनी निराश होऊन जाऊ नये, टर्मिनसच्या दर्जावाढीकरीता सर्वचजण प्रयत्नशील आहोत. राज्य शासनाकडे सुद्धा आर्थिक मदत मागीतली आहे. कोकण रेल्वेनं देखील तसा प्रस्ताव तयार करण्याच काम सुरु केले आहे. पुढच्या काही आठवड्यात कोकण रेल्वेच्या एमडींसोबत प्रत्यक्ष पहाणी करणार आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस परिपूर्ण अपग्रेड करणार असल्याचं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. तर कोकण रेल्वे सध्या आर्थिक संकटात असून भारतीय रेल्वेचा पाठिंबा त्याला मिळावा अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. मात्र, आता कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा अशी मागणी देखील पुढे येत आहे. तसं झाल्यास भारतीय रेल्वेचा आर्थिक पाठिंबा मिळू शकतो असंही खा.राऊत म्हणाले. तर टर्मिनसबाबत स्थानिका आमदार केसरकरांबद्दलच्या मुद्यावर  भाष्य करणं त्यांनी टाळलं.