जबाबदारी वाढली….!

Edited by:
Published on: March 10, 2024 10:45 AM
views 130  views

नवोदय विद्यालय, सांगेलीतील विषबाधेच्या घटनेने केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर राज्य हादरले. गुरुवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर आजपावेतो मुले रुग्णालयात बेडवर पडून उपचार घेत आहेत. भोजनातील हा अक्षम्य हलगर्जीपणा केवळ मुलांना आणि साहजिकच त्यांच्या पालकांना भोगावा लागत आहे. गुरुवारी रात्री विश्वासाने मुलांनी आहार घेतला. पहाटे चार-साडे चारच्या दरम्यान त्यांना पोटदुखी, जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या. शुक्रवारी सकाळी साडे अकरा-बाराच्या दरम्यान वाऱ्याच्या वेगाने संकेतस्थळांवरुन, समाजमाध्यमांवरुन ही बातमी पालकांपर्यंत पोहोचताच त्यांची पाचावर धारण बसली. मुलांच्या काळजीने बेभान पालकांनी नवोदय विद्यालय गाठले. रुग्णालयात जाणाऱ्या रस्त्यावरुन सारखे रुग्णवाहिकांचे 'सायरन' ऐकू येत होते. उलट्या, जुलाब आणि पोटदुखीने त्रस्त मुले अक्षरश: हैराण झाली होती; किंबहुना काहीजण आजही उपचार घेत आहेत. या सर्व प्रकारात मुलांना पोहोचलेले शारीरिक, मानसिक नुकसान विचारउद्युक्त करणारे आहे. दहावीची महत्वा कची परीक्षा सुरु असताना या इयत्तेतील ज्या मुलांना विषबाधेची लागण झाली, त्या मुलांची मन:स्थिती आपण जाणलेलीच बरी ! रुग्णालयांमध्ये जाऊन पाहिले असता हे विद्यार्थी-विद्यार्थीनी बेडवर उपचार सुरू असताना दुसऱ्या बाजूने अभ्यास करताना दिसत आहेत. 

मुळात अपघात हा अनावधानानेच होत असतो, तो कुणीही मुद्दाम करीत नाही, हे नि:संशय ! पण थोडासाही दुर्लक्षपणा फार मोठ्या अपघातास कारणीभूत ठरतो. एखाद्यावेळी होत असलेली चूक त्याच वेळेस लक्षातही येत असते, पण ''जाऊ दे, एवढ्याने काय होते !''  अशा भावनेतूनही गोष्टी घडून जातात. आणि साहजिकच त्याचे परिणाम भयंकर होतात. 

आता सांगेलीतील विषबाधा का झाली, कशी झाली, त्यामागचे कारण काय होते, हे ठरविण्याचा अधिकार संबंधित तज्ज्ञमंडळींचा आहे.  चौकशीतून त्याचा खुलासा होईल. परंतु घडलेली घटना विचारजनक अशीच आहे. एकाचवेळी पहाटेपासून शेकडो मुलांना उलट्या, जुलाब होण्याच्या या भयंकर स्थितीत तात्काळ जिल्ह्यातील डॉक्टर्सनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळेच आज मुले सुखरुप आहेत. आणि हे आमचे सिंधुदुर्गचे सुदैव समजायला हवे. 

शासन, केंद्र वा राज्य कोणतेही असो, मुलांबाबत नेहमीच संवेदनशील असते. एवढेच नव्हे तर संविधानातील मुलभूत हक्कांमध्येही मुलांच्या शिक्षणाचा हक्क अंतर्भुत केलेला आहे. पुढे शासनाने अंमलात आणावयाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आणि मुलभूत कर्तव्यामध्ये देखील मुलांच्या शिक्षणास प्राधान्य देण्याचे विहीत आहे. 'जवाहर नवोदय विद्यालय योजना ' ही मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरू करण्यात आली.  हे विद्यालय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असते.  ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही विद्यालये सुरु करण्यात आली. या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. एकदा प्रवेश मिळाल्यावर मुलांचे सहावीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण येथे पूर्ण होते. ही विद्यालये वंचित घटकांतील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी समान संधी देण्यावर लक्ष केंद्रित करतात.  विद्यार्थ्यांना निवास, भोजन, पुस्तके तसेच दर्जेदार शिक्षण दिले जाते.  एका अर्थाने ही विद्यालये जबाबदारीने मुलांचे पालकत्व स्वीकारतात. 

घटनेचे वृत्त समजताच पालकांनी विद्यालयात धाव घेऊन स्वयंपाकगृहाची पाहणी केली. त्यावेळेस स्वयंपाकगृहातील अस्वच्छता त्यांच्या निदर्शनास आली. या विद्यालयांकडे पाहण्याचा जनमानसाचा एक दृष्टीकोन आहे. अर्थात, तो या विद्यालयानेच इतक्या वर्षात निर्माण केलेला आहे. येथे असणारी प्रत्येक सुविधा ही दर्जेदार असते. असे असताना शेकडो मुलांचे भोजन बनणाऱ्या स्वयंपाकगृहात अत्यावश्यक असणारी स्वच्छता असू नये, याचे सखेद आश्चर्य वाटते. आपणास मिळत असलेला आहार हा पौष्टिक आणि उत्तम आहे, असा विश्वास विद्यार्थ्याच्या मनात आपसूकच तयार झालेला असतो.  मुलांचा स्वयंपाकगृहांशी काहीही संबंध येत नसतो.  तेथील स्वच्छता, वापरण्यात येणारे पदार्थ याविषयी मुले अनभिज्ञ असतात. मुलांच्या शिक्षणाइतकाच त्यांचा आहार महत्वातछचा नाही का ? विषबाधा होण्यामागची कारणे ही पुढची गोष्ट आहे. प्रथमत: स्वयंपाकगृह तसेच तेथील भांडी स्वच्छ असणे ही प्राथमिक बाब आहे.  शासन स्वच्छता अभियान का राबवीत असेल? शाळाशाळांमधून स्वच्छतेचे नियम का सांगितले जात असतील? स्वयंपाकगृहातील स्वच्छतेविषयी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत असताना शासनाच्याच विद्यालयात स्वच्छता असू नये, हे फार मोठे दुर्दैव आहे.

अर्थात, शासन मुलांचे भारी लाड करत असते. 'माध्यान्ह आहार योजना' ही शासनाची मुलांसाठीची आणखी एक योजना आहे. ही योजना राबवीत असताना काही नियम आखून दिले आहेत. त्यातील एक उल्लेखनीय नियम असा आहे की, विद्यार्थ्यांना द्यावयाचा आहार तयार झाल्यावर प्रथम तो शिक्षकांनी सेवन करावा. त्यानंतर अर्ध्या तासाने मुलांना द्यावा. का तर, आहारात काही दोष असेल तर त्याचे परिणाम त्या अर्ध्या तासात दिसतील. तसे असल्यास दोषयुक्त आहार मुलांना दिला जाणार नाही. एवढा विचार शासनाकडून केला जातो. आणि शाळांमध्येही या नियमाचे पालन केले जाते. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक निरीक्षण केल्यास स्वयंपाकगृह, शौचालये, मुतारी अशा ठिकाणी कटाक्षाने स्वच्छतेचे पालन होत असल्याचे निदर्शनास येते. विशेष एवढ्यासाठीच की, या शाळांमध्ये स्वच्छतेसाठी शिपाई नाही. तरीसुद्धा ! 

शासन मुलांचा एवढा विचार करीत असेल तर शासकीय योजना राबविणाऱ्या आम्हा नागरिकांना कोवळ्या मुलांच्या विश्वासाशी खेळण्याचा अधिकार कुणी दिला ?

जवाहर नवोदय विद्यालयाने कालपावेतो विद्यार्थ्यांचा, पालकांचा विश्वास जिंकला होता. दर्जेदार शिक्षणाबरोबरच आहारातही सर्वोत्कृष्टता होती. येथे गेलेली मुले शैक्षणिक प्रगतीबरोबरच आरोग्यही कमावत, हा मागील काही वर्षांचा अनुभव येथून शिकून गेलेली मुले आणि पालक सांगतात. मात्र, या ताज्या विषबाधेच्या घटनेने त्या परिस्थितीत बदल झाल्याचे दाखवून दिले आहे.   या घटनेचे पडसाद गंभीरपणे उमटले.  

अपघात हा अपघातच असतो. पण त्या चुकीची पुनरावृत्ती न होता विद्यालयाची सर्वोत्कृष्टता कायम ठेवणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गातील दर्जेदार शिक्षणाचे हे उत्तम केंद्र आहे.  झालेल्या चुका निस्तरुन पुन्हा एकदा शिक्षण, भोजन, याबरोबरच इतर सुविधांबाबत असलेला दर्जा कायमस्वरुपी टिकवून ठेवणे महत्वाृतचे आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विषबाधा झालेली मुले आता उपचारानंतर विद्यालयात परतणार आहेत. आधीच शरीरातील पाणी जाऊन ही मुले कोमेजलेली आहेत. त्यांच्यात अशक्तपणा आलेला आहे. त्यामुळे या मुलांना पुरेशा पोषक आहाराची गरज आहे. पालक धास्तावले आहेत. आपण ज्या पद्धतीने काळजी घेऊ, त्याच पद्धतीने मुलांकडे लक्ष द्यावे अशी स्वाभाविक अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे.  जवाहर नवोदय विद्यालयास आपला दर्जा टिकविण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. एका अर्थाने विद्यालयावरील जबाबदारी वाढली आहे, हे निश्चित !

सौ. मंगल नाईक-जोशी