सावंतवाडीत चोऱ्या - अपहरणाऱ्या प्रकरणात वाढ

शिवसेनेनंं वेधलं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: October 02, 2022 12:18 PM
views 224  views

सावंतवाडी : गेल्या काही दिवसापासून चोऱ्या, अपहरणाचा प्रयत्न सारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे

यासाठी पोलिसांनी खास मोहीम हाती घेतली पाहिजे अशी अपेक्षा आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे आंतरराज्य पोलीस समन्वय हवा आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्याच्या सीमेवर गोवा, कर्नाटक राज्य आहे. त्यामुळे चोऱ्या किंवा अपहरणाचा प्रयत्न करणारे पळून जातात त्यामुळे आंतरराज्य पोलीस समन्वय हवा.

दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदीरात देवीची किंमती प्रभावळ चोरीला गेले. या चोरीची सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. पण चोर पळून गेले. ते अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भक्त शांत संयमी आहेत. या घटनेमुळे लोकभावनाचा आदर राखला जाईल अशी कृती पोलीसांनी केली पाहिजे. सावंतवाडी शहरात मोती तलावाच्या काठावर बसून रात्रीच्या वेळी मोती तलावातील मासे परप्रांतीय लोक काढत आहेत. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्यात परप्रांतीय लोकांचे हे चाळे कैद झालेले असतील. सीसीटीव्ही कॅमेरात असे अनेक प्रकार कैद झालेले असतील पण त्याबद्दल पोलीसांनी जागरूक राहून नागरिकांना सतर्क केले पाहिजे.

आज परप्रांतीय कामगार, व्यावसायिक व फिरते विक्रेते दिसून येतात. त्यांची नोंद पोलीस ठाण्यात फोटो, पत्ता सह ठेवली पाहिजे. घर मालकांनी भाडे तत्वावर ठेवले असेल तर त्यांनी पोलिसांना कळवले आहे किंवा कसे हे तपासून पाहिले पाहिजे. तसेच परप्रांतीय विविध प्रकारच्या वस्तू विक्री करण्यासाठी  गावोगावी फिरताना दिसतात त्यावेळी सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होत आहे. त्यातून विद्यार्थी अपहरण, मंगळसूत्र पळविणे, चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे गावोगावी फिरताना दिसणाऱ्याची चौकशी केली पाहिजे. शालेय विद्यार्थी अपहरण सारख्या प्रकाराची चर्चा सुरू आहे. तसाच प्रकार बांदा येथे घडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी जलदगतीने उपाययोजना आखल्या पाहिजेत अशी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी मागणी केली आहे. यावेळी गुणाजी गावडे, विशाल सावंत आदी उपस्थित होते.