कणकवली डेंगूसदृश्य रुग्णांमध्ये वाढ

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 11, 2023 20:16 PM
views 389  views

कणकवली : कणकवली तालुक्यामध्ये सदयस्थीतीमध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत असून आजपर्यंत विविध गावांतील मिळून जवळपास १४० सिरम सॅम्पल घेऊन त्यांची डेंग्यू तपासणी करणेत आली आहे.त्यामध्ये शिरवल-४, दारिस्ते - २, हळवल - १, सांगवे - १, बावशी- १, नागवे - १, बिडवाडी- १, कलमठ- १, सातरल- १, कणकवली शहर-२ असे मिळून १५ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत.शिरवल येथे डेंग्यू साथ घोषित करण्यात आली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पूजा काळगे यांनी दिली.



 सदयस्थीतीमध्ये हे सर्व रुग्ण देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. वरील पैकी फक्त शिरवल येथे डेंग्यू साथ घोषित करणेत आहे. तेथे आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच राबविणेत आल्याने सदर साथ नियंत्रणात आलेली आहे. कणकवली तालुक्यामध्ये डेंग्यू रुग्ण आढळलेल्या सर्व भागांमध्ये तात्काळ विशेष ताप रुग्ण सर्व्हेक्षण आरोग्य विभागामार्फत करणेत आहे. या भागामध्ये नव्याने डेंग्यू रुग्ण आढळलेले नाहीत. सदर गावांमध्ये ग्रामपंचायत सहकार्याने डास अळी घनता वाढ असलेल्या भागामध्ये तातडीने धूर फवारणी करून घेणेत येत आहे. तसेच तालुक्यातील सर्व गावांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका सीएचओ यांच्या माध्यमातून खालीलप्रमाणे उपाययोजना राबविणेत येत आहेत.


दैनंदिन व नियमित ताप रुग्ण सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जावुन डेंग्यू या आजाराबाबत सर्व्हेक्षण करून या आजाराबाबत घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन करून आरोग्य शिक्षण देत आहेत. सर्व्हेक्षणात ताप रुग्ण आढळल्यास त्याचे डेंग्यू, मलेरिया तपासणी करिता रक्त नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठवून त्याबाबतची तपासणी तातडीने करून घेणेत येत आहे.


किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण किटकजन्य आजरांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांचेमार्फत गृहभेटीदरम्यान डास अळयांचा शोध घेउन त्यामध्ये टेमिफॉस / अॅबेट या किटकनाशकाचा वापर करून या अळया नष्ट करणेत येत आहेत. याचबरोबर जिल्हास्तरीय किटक समाहारकामार्फत बाधीत भाग व लगतच्या भागातील डास अळी घनता पडताळणी केली जात असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेत येत आहेत.


निदान- जिल्हा रेण्वीय निदान प्रयोगशाळा या ठिकाणी डेंग्यू या आजाराची तपासणी दैनंदिन करणेची सुविधा डॉ. श्री. श्रीपाद पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. • दुषित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना आरोग्य यंत्रणेमार्फत त्वरीत औषधोपचार करण्यात येत आहे.


जिल्हा हिवताप अधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये भेटी देऊन आरोग्य कर्मचा-यांना मार्गदर्शन केले जात आहे.तालुकास्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टिम व साथ नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करणेत आलेला असून त्यांच्यामार्फत

कार्यक्षेत्रामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपायोजना राबविणेबाबत मार्गदर्शन करणेत येत आहे.खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांना त्यांच्याकडे दाखल होणा-या ताप रुग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करणेत आले आहे. डेंग्यू बाधीत भागात आवश्यक तेथे वैद्यकिय पथके पाठवुन रुग्णाना सेवा देण्यात आलेली आहे.या सर्व बाबींचा विचार करता तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन करणेत येते कि, किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधाकरिता आरोग्य विभाग करत असलेल्या उपयायोजनांबरोबरच नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी किटकजन्य आजारांपासून संरक्षणाकरिता व डास अळी प्रतिबंधाकरिता घर व घराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरामध्ये कुठेही पाणी साचू देऊ नये. ताप येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत शासकिय दवाखान्यात उपचारासाठी यावे आणि सर्व शासकिय दवाखान्यामध्ये मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. डासांच्या चाव्यापासून संरक्षणाकरिता मच्छरदाणी, मच्छरविरोधी अगरबत्ती, ओडोमास, इ. चा वापर करावा. 

आपल्या परिसरामध्ये जिल्हयाबाहेरुन आलेल्या व्यक्तींची माहिती त्वरीत आरोग्य यंत्रणेस दयावी. जेणेकरून त्या ठिकाणी सर्व्हेक्षण करून पुढे होणारे किटकजन्य आजार टाळता येतील. आठवडयातून एक दिवस (कणकवली तालुका प्रत्येक मंगळवार) कोरडा दिवस पाळणे- यादिवशी घरातील पाणी साठवणूकिची सर्व भांडी रिकामी करून घासून पुसून कोरडी करुनच पुन्हा वापरास घ्यावीत, घराच्या परिसरातील जे पाणी साठे रिकामे करता येणार नाहीत ते झाकून ठेवावेत, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी कणकवली यांचेमार्फत करणेत येत आहे.