
सावंतवाडी : सर्वोदय नगर कॉलनी, सावंतवाडी येथे गेल्या महिनाभरापासून गॅस पाईपलाईन व पाणीपुरवठा लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराकडून योग्य दक्षता घेतली जात नसल्याने येथील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवक अजय गोंदावळे तसेच निलम नाईक यांनीही संबंधितांना धारेवर धरत लोकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याची सुचना दिली.
येथील रहिवाशांची कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे प्रचंड धूळ, घाण व अस्वच्छता पसरत असल्याची तक्रार आहे. काम सुरू असताना नगरपरिषदेचा एकही जबाबदार कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नसतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या महिनाभरात या परिसरातील अनेक नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागले. यास संपूर्णपणे सद्यस्थितीत सुरू असलेले नियोजनशून्य व बेजबाबदार काम कारणीभूत आहे अशी तक्रार येथील रहिवाशांनी मांडली आहे. येत्या दोन दिवसांत हे काम तात्काळ थांबवून योग्य पद्धतीने, आवश्यक खबरदारी व प्रशासनाच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात यावे. अन्यथा, सर्वोदय नगरमधील नागरिक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत असा इशारा देखील देण्यात आला आहे. आज होईल, उद्या होईल अशा खोट्या आश्वासनांमुळे संपूर्ण परिस्थिती धुळीत रंगवलेली आहे. वेळीच यावर आवर घातला तर ठीक. अन्यथा, उद्भवणाऱ्या जनक्षोभाला प्रशासन स्वतः जबाबदार राहील असाही कडक इशारा दिला गेलाय.












