न्यायालयाच्या इमारतीत पुरेशी जागा नसल्याने गैरसोय

Edited by:
Published on: April 20, 2025 11:44 AM
views 81  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीत पुरेशी जागा नसल्यामुळे न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या गरीब शेतकरी आणि वकिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ऐतिहासिक इमारतीत न्याय मिळवण्यासाठी दूरदूरहून नागरिक येत असतात. या इमारतीत अपुरी जागा असल्यामुळे विशेषतः पावसाळ्यामध्ये लोकांना ताटकळत उभे राहावे लागते.

तसेच, वकिलांना बसण्यासाठी देखील पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे न्यायालयीन कामकाज सुरळीतपणे होण्यास अडचणी येत आहेत. शेतकरी व कामगार संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शासनाला निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नवीन न्यायालयीन इमारतीसाठी शहरात शासकीय जागा उपलब्ध आहे. जुन्या कोर्टाच्या बाजूला पंचायत समितीची जागा तसेच टेक्निकल शाळेजवळ पोलीस ग्राऊंडच्या बाजूला असलेली जागा शासनाच्या मालकीची आहे. यापैकी योग्य जागेवर नवीन इमारत बांधल्यास कोर्टात कामासाठी येणारे शेतकरी, सामान्य नागरिक आणि वकिलांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी संघटनेने केली आहे. या गंभीर समस्येकडे शासनाने प्राधान्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. शेतकरी व कामगार संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर यांनी हे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांना पाठवले आहे.