LIVE UPDATES

मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या सिंधुदुर्ग विभागीय फेरीचे दिमाखात उद्घाटन

२८ महाविद्यालयांचा सहभाग : ५५० हून अधिक विद्यार्थी ३१ कलाप्रकारांत दाखवणार कलागुण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 08, 2026 20:24 PM
views 29  views

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या सिंधुदुर्ग विभागीय फेरीचे उद्घाटन आज यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विवेकानंद सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांतील ५५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले असून, ३१ विविध कलाप्रकारांमध्ये दिवसभर स्पर्धा रंगणार आहेत.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत व लखमराजे भोसले तसेच मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे उपस्थित होते. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा युवा महोत्सव समन्वयक डॉ.आशिष नाईक, डॉ. नितीन वळंजू यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे सीईओ ले.कर्नल डॉ.रत्नेश सिन्हा, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.विजय जगताप, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ.रमण बाणे तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.बॉनी शेराव्ह देखील उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच देवी सरस्वतीच्या प्रतिमेला आणि नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रमण बाणे यांनी केले. त्यांनी महोत्सवात सहभागी झालेल्या महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची माहिती देत सर्व स्पर्धकांचे स्वागत केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. लखमराजे भोसले यांनी युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचा मंच असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळते आणि त्यांना आपल्या प्रतिभेचे सादरीकरण करण्याची संधी मिळते असे नमूद करत त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

निलेश सावे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाच्या अंतिम फेरीत सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी छाप निर्माण केली आहे असे ते म्हणाले. यावेळी डॉ.आशिष नाईक आणि ले. कर्नल डॉ.रत्नेश सिन्हा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत युवा महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. या विभागीय फेरीत ३१ विविध कलाप्रकारांमध्ये स्पर्धा होणार असून, दिवसभर विविध ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. दिवसभराच्या स्पर्धांनंतर सायंकाळी उशिरा निकाल जाहीर करण्यात येणार असून रात्री उशिरा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. उदघाटन कार्यक्रमाचे निवेदन अमर प्रभू यांनी केले.