
सावंतवाडी : येथील सबनीसवाडा परिसरात वास्तव्यास असलेले वृद्ध शंकर महादू उघडे (वय ८८, मूळ रा. मु.पो. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मृत्यू झाला. ही घटना ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शंकर उघडे हे सन २०११ पासून पॅरेलेसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर ओरोस, कोल्हापूर आणि सावंतवाडी येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. ८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना अचानक लघवीचा त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाइकांनी उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी मयत यांचे नातेवाईक सावळीराम शंकर उघडे (वय ५३, रा. मु.पो. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे; सध्या रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांच्या खबरीवरून सावंतवाडी पोलिसांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५३/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. हिंगे, पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.











