
देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीत मिनी क्रीडा संकुलाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पामुळे देवगड शहरात क्रीडा क्षेत्राला नवे बळ मिळणार असून स्थानिक तरुण-तरुणींना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी बोलताना ना. नितेश राणे यांनी सांगितले की, हा प्रकल्प पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात येत असून पुढील टप्प्यांमध्ये विविध आधुनिक सुविधा वाढवून शहराला साजेसा सर्वसमावेशक क्रीडासंकुल उभारण्यात येईल. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या सुविधा टप्प्याटप्प्याने जोडल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “या क्रीडांगणामुळे स्थानिक तरुण-तरुणींना विविध खेळांची संधी उपलब्ध होईल. त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धात्मक क्षमताही वाढेल. कणकवलीप्रमाणेच दर्जेदार क्रीडासंकुल उभारण्याचा आमचा संकल्प आहे.”
या प्रकल्पामुळे केवळ क्रीडा क्षेत्रालाच चालना मिळणार नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळून पर्यटनालाही सकारात्मक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी आमदार अजित गोगटे, मंडळ अध्यक्ष राजा भुजबळ, सभापती बुवा तारी, तनवी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, योगेश चांदोस्कर, योगेश पाटकर, दया पाटील, विवेक खोत यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.










