सिंधुदुर्ग जिल्हा बारावी निकालात अव्वल

९५.९४% निकालाची दमदार नोंद
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 02, 2026 17:46 PM
views 15  views

सिंधुदुर्गनगरी :  फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत ९५.९४ टक्के निकाल नोंदवला आहे. कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपले नंबर एक एण्याचे सातत्य कायम ठेवले आहे. मात्र गट वर्षी पेक्षा या वर्षी निकालात थोडी घसरण झाली आहे. असे असले तरी मुलांपेक्षा मुलींनी पास होण्याचे सातत्य कायम ठेवले आहे.

नियमित विद्यार्थ्यांचा निकाल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियमित (Fresh) विद्यार्थ्यांपैकी ८०२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७९७३ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ७६५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.९४% इतका लागला आहे.

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल

पुनर्परीक्षार्थी गटात ६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५९ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल ५४.२३% इतका नोंदवण्यात आला आहे.

शाखानिहाय कामगिरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे 

विज्ञान शाखा : ९८.९०%

कला शाखा : ८९.२०%

वाणिज्य शाखा : ९५.९९%

व्यावसायिक शाखा : ९३.२४%

तांत्रिक शाखा : ७१.०५%

यामध्ये विज्ञान शाखेने सर्वाधिक निकाल देत आघाडी घेतली आहे.

मुलींची पुन्हा सरशी

जिल्ह्यात मुलींची कामगिरी मुलांपेक्षा सरस ठरली आहे. मुलांचा निकाल ९४.२४% तर मुलींचा निकाल ९७.०५% इतका लागला असून मुली २.८१% ने पुढे आहेत.

परीक्षा केंद्र व व्यवस्था

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८७ कनिष्ठ महाविद्यालये व २३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडली. परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारविरहित वातावरणात पार पडली, ही समाधानकारक बाब आहे.

निकालात ३. ३३ ची घसरण 

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात किंचित घट झाली आहे. गतवर्षी २०२५ मध्ये ९९. २७% एवढा निकाल लागला होता तर हा निकाल यावर्षी ९५. ९४% एवढा लागला आहे यावर्षी हा निकाल ३. ३३% एवढा कमी असली तरी विद्यार्थ्यांनी एकूण चांगली कामगिरी केली आहे.

पुढील प्रक्रिया

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

एकूणच, सिंधुदुर्ग जिल्ह्याने बारावी निकालात सातत्यपूर्ण गुणवत्ता दाखवत ९५ टक्क्यांहून अधिक निकाल नोंदवला असून विशेषतः मुली आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.